कोल्लम येथील मंदिरातील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला भेट दिल्याने जनतेला दिलासा मिळाला, असे वक्तव्य मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी केले आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक टी.पी. सेनकुमार यांनी मोदी तसेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्याला आक्षेप घेतल्याचे वृत्त होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे मत महत्त्वाचे आहे.
या मोठय़ा दुर्घटनेनंतर महत्त्वाच्या नेत्यांचा सल्ला व उपस्थिती महत्त्वाची ठरली, असे चंडी यांनी स्पष्ट केले. सेनकुमार यांनी या दुर्घटनेनंतर १२ तासांमध्येच घटनास्थळी पंतप्रधानांनी भेट देण्यास आक्षेप घेतला
होता.
मदतकार्यात सर्व पथके असताना, मोदी किंवा राहुल गांधी यांच्या दौऱ्यांनी त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे लागेल या हेतूने महत्त्वाच्या व्यक्तींनी तातडीने दौरे करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
सेनकुमार यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नये, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते बोलले, असे स्पष्टीकरण गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी दिले आहे.