दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सलग तीन सभांमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढविला. वाढत्या महागाईची काँग्रेसला चिंता नाही. त्यांना केवळ सत्ता पाहिजे आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी केवळ मलाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप मोदी यांनी केला. जनता जाब विचारेल म्हणून काँग्रेसचे बडे नेते दिल्लीत प्रचार करायला घाबरतात, असा टोला मोदींनी लगावला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा अपवाद वगळता दिल्लीस्थित एकाही काँग्रेस नेत्याने अथवा मंत्र्याने विधानसभा निवडणुकीत प्रचार केला नाही, याकडे मोदींनी लक्ष वेधले.
दिल्लीतील शाहदरा, सुलतानपुरी व चाँदनी चौकात मोदींच्या सलग तीन सभा झाल्या. तीनही सभांमध्ये मोदी यांनी वाढती महागाई, भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून काँग्रेसला नेस्तनाबूत करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. मोदी म्हणाले की, काँग्रेसला जनतेशी काहीही देणे-घेणे नाही. जनतेच्या प्रश्नावर कोणत्याही नेत्याला बोलायचे नाही. देशातील कोणतीही समस्या असली तरी तिचा संबंध गुजरातशी जोडण्याची फॅशन काँग्रेसने आणली आहे. कारण जनतेचे लक्ष त्यांना विचलित करायचे आहे. मला बदनाम करण्याचा कट गुजरातच्या जनतेने हाणून पाडला. आता फेसबुक, ट्विटरवरून माझ्याविरोधात राळ उठवली आहे. तेथेही त्यांना जनताच उत्तर देईल, अशी टीका मोदींनी चाँदनी चौकातील सभेत केली. चाँदनी चौक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी अलीकडेच आपले ट्विटर खाते सुरू केले आहे. त्याचा उल्लेख न करता मोदींनी सिब्बल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. दिल्लीत पहिल्यांदाच मोदींनी गांधी कुटुंबीयांव्यतिरिक्त काँग्रेस नेत्यांना झोडपले. ते म्हणाले की, आपले पंतप्रधान अर्थतज्ज्ञ आहेत. अर्थमंत्री पी. चिदंबरम विद्वान आहेत. पण जगात आपणच बुद्धिमान असून इतर सारे मूर्ख आहेत, अशा आविर्भावात हे नेते असतात. गोरगरीब दोन भाज्या खातात असा साक्षात्कार काँग्रेस नेत्यांना होतो व त्यानंतर भाज्यांचे दर वाढतात. देशातील साऱ्या समस्येचे मूळ केवळ भ्रष्ट व सुस्त प्रशासनात आहे. प्रशासन चांगले झाल्यास समस्यांवर सहज मात करता येते, असा दावा मोदी यांनी केला.
श्रीनगरमध्ये मोदींची सभा रोखण्याचा प्रश्नच नाही -ओमर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची श्रीनगरमध्ये जाहीर सभा घेण्याची इच्छा असल्यास त्यांना रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
मोदी यांना रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, भाजपचे येथे युनिट आहे आणि ५०० जणांना संबोधित करण्याची त्यांची इच्छा आहे तर त्यांनी जरूर यावे, त्यांना कोणीही रोखलेले नाही, असे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही फुटीरतावादी शक्तींनाही राजकीय कारवायांपासून रोखत नाही, त्यामुळे मोदी यांना रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किश्तवार दंगलीनंतर स्थिती अधिकच चिघळेल अशी अटकळ बांधण्यात येत असल्याने भाजप नेत्यांना यापूर्वी रोखण्यात आले होते, असेही अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.