सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अनावश्यक मुद्द्यांवरून एकसारखीच भाषा बोलत आहेत. त्यांच्याकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला कोणताच ठोस मुद्दा उरला नसल्याने असे होत आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी केली. सिद्धरमय्या यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरमय्या यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. भाजपाकडून सध्या सातत्याने अनावश्यक मुद्दे उकरुन काढले जात आहेत. योगी आदित्यनाथही अशाच मुद्द्यांवर बोलतात आणि अमित शहादेखील त्यांचीच री ओढतात. या नेत्यांकडे मांडण्यासाठी ठोस मुद्देच उरलेले दिसत नाहीत. पंतप्रधान मोदीनींही कदाचित तेच पालूपद लावले तर आश्चर्य वाटायला नको, असे सिद्धरमय्या यांनी म्हटले.

संघ आणि भाजपवाले माणुसकी नसलेले हिंदू – सिद्धरमय्या

कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी घडत आहेत. यामध्ये भाजपने कर्नाटकमधील काँग्रेस सरकारविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. मात्र, कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसविरोधात कोणतीही प्रस्थापितविरोधी लाट (अँटी-इन्कम्बन्सी) नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सहजपणे विजय मिळवेल, असा दावा सिद्धरमय्या यांनी केला. राहुल गांधीही कर्नाटकधील पक्षाच्या कामगिरीवर खूष आहेत, असेही सिद्धरमय्या यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी सिद्धरमय्या यांनी संघ परिवार आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना दहशतवादी संबोधून नवा वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर भाजपचे नेते सिद्धरामय्या यांच्यावर तुटून पडले होते. त्यांनी या विधानासाठी माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली होती. मात्र, सिद्धरमय्या यांनी माफी मागण्यास नकार दिला. मी संघ आणि भाजपचे कार्यकर्ते हिंदू दहशतवादी असल्याचे म्हटले होते. मी देखील हिंदू आहे. मात्र, माझ्यात माणुसकी आहे. याउलट संघ आणि भाजपचे लोक माणुसकी नसलेले हिंदू आहेत, असे स्पष्टीकरण सिद्धरमय्या यांनी दिले होते.