14 October 2019

News Flash

मोदी जिथे जातात तिथे खोटं बोलतात, राहुल गांधींचा पुन्हा एकदा ‘चौकीदार चोर है’चा नारा

'नरेंद्र मोदींची कोणतीही विश्वासार्हता राहिलेली नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे खोटं बोलतात असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. काँग्रेसने उपोषणाला पाठिंबा दर्शवला असून राहुल गांधी यांनी उपोषणस्थळी जाऊन चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

‘मी आंध्र प्रदेशच्या लोकांसोबत आहे. हे कोणत्या प्रकारचे पंतप्रधान आहेत ? आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेलं आश्वासनही त्यांनी पूर्ण केलं नाही. मोदी जिथे जातात तिथे खोटं बोलतात. त्यांची कोणतीही विश्वासार्हता राहिलेली नाही’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी फक्त काही महिनेच बाकी आहेत, विरोधक त्यांना आपली ताकद दाखवून देतील असं सांगितलं. यावेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा राफेलचा उल्लेख करत आंध्र प्रदेशातील लोकांचे पैसे अनिल अंबानींना देण्यात आले असा आरोप करत चौकीदार चोर है चा नारा लगावला.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबू नायडू करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्र प्रदेशात रॅली झाल्यानंतर लगेचच चंद्राबाबू नायडू यांनी उपोषणास सुरुवात केली. नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू प्रचारसभांसाठी जनतेच्या पैशांची नासा़डी करत असल्याचा आरोप केला होता.

‘आज आपण येथे सगळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गोळा झालो आहोत. आपल्या आंदोलनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे गेलो होती. याची गरजच काय असं मला विचारायचं आहे’, असा प्रश्च चंद्राबाबू नायडू यांनी विचारला आहे.

‘जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलंच माहित आहे. हा आंध्र प्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधानांना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणं थांबवा’, असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

 

First Published on February 11, 2019 11:28 am

Web Title: narendra modi lies wherever he goes alleges rahul gandhi