पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदींचे परदेश दौरे हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. गेल्या तीन वर्षात मोदींनी तब्बल ५६ वेळा परदेश दौरे केल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारनेच लोकसभेती ही माहिती दिली आहे.

लोकसभेत बुधवारी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांची माहिती दिली. मे २०१४ मध्ये मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. यानंतर जून २०१४ मध्ये त्यांनी सर्वप्रथम भूतानचा दौरा केला होता. मोदींनी चार वेळा अमेरिकेचा दौरा केला आहे. याशिवाय रशिया, जपान, अफगाणिस्तान, नेपाळ आणि चीनचा दोन वेळा दौरा केला. सप्टेंबर २०१४ मध्ये मोदींनी संयुक्त राष्ट्रातील महासभेसाठी न्यूयॉर्कचा दौरा केला होता. या दौऱ्यात मोदींनी ओबामांची भेट घेतली होती. यासोबत त्यांनी ५०० कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली होती.

अणू शिखर परिषदेसाठी २०१६ मध्ये मोदींनी तिसऱ्यांदा अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी अणू सुरक्षेत भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली होती. ओबामांच्या विनंतीनंतर २०१६ मध्ये मोदी पुन्हा अमेरिकेत गेले. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेच्या संसदेलाही संबोधित केले होते. तसेच ऑगस्ट २०१४ मध्ये मोदींनी नेपाळचा दौरा केला. १४ वर्षानंतर भारतीय पंतप्रधान नेपाळ दौऱ्यावर गेले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये सार्क परिषदेसाठी मोदी पुन्हा नेपाळमध्ये गेले होते.

मोदींनी २०१५ मध्ये ब्रिक्स परिषदेसाठी रशियाचा दौरा केला होता. तर डिसेंबर २०१५ मध्ये त्यांनी द्विपक्षीय चर्चेसाठी रशियाचा दौरा केला होता. मोदी डिसेंबर २०१५ आणि जून २०१६ मध्ये अफगाणिस्तान दौऱ्याला गेले होते. मोदींचा मंगोलियाचा दौरा हा सर्वात विशेष दौरा ठरला आहे. भारत आणि मंगोलियाच्या संबंधांना ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी मंगोलियात गेले होते. मंगोलिया दौरा करणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले होते. याशिवाय मार्च २०१५ मध्ये सीशेल्स, ऑगस्ट २०१५ मध्ये संयुक्त अरब अमिरातचा दौरा केला होता. तर एप्रिल २०१५ मध्ये कॅनडा आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांनी ब्रिटनचा दौरा केला होता.