पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याचे विधान मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले असतानाच मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी माझ्याशी लग्न केले असून ते माझ्यासाठी प्रभू रामच आहेत, असे जशोदाबेन यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी नुकतेच एका कार्यक्रमात मोदी अविवाहित असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर आता जशोदाबेन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हि़डिओ मोबाईल कॅमेऱ्यावर शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओत जशोदाबेन म्हणतात, आनंदीबेन यांचे विधान ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मोदी यांनी स्वत: २००४ मध्ये त्यांच्या प्रतिज्ञापत्रात विवाहित असल्याचा उल्लेख केला होता. यात त्यांनी पत्नी म्हणून माझे नाव लिहीले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

एका सुशिक्षित महिलेने (आनंदीबेन यांना उद्देशून) माझ्यासंदर्भात असे विधान करणे अशोभनीय आहे. त्यांच्या विधानामुळे मोदींच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. मी नरेंद्र मोदींचा आदर करते आणि माझ्यासाठी ते प्रभू रामच आहेत, असे जशोदाबेन यांनी नमूद केले.

वृत्तसंस्था ‘आयएएनएस’शी बोलताना जशोदाबेन यांचे बंधू अशोक मोदी यांनी व्हिडिओ जशोदाबेन यांचाच असल्याचे स्पष्ट केले. आनंदीबेन यांचे विधान आम्ही सुरुवातीला सोशल मीडियावर वाचले. पण यानंतर १९ जूनरोजी एका स्थानिक वृत्तपत्रात यासंदर्भातील वाचली. मग आम्ही यावर प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:च्या मोबाईलमध्ये जशोदाबेन यांचा व्हिडिओ शूट करुन प्रसारित केला, असे अशोक मोदींनी सांगितले.