26 September 2020

News Flash

लाहोर भेटीने मोदींचे पुढचे पाऊल..

‘पाकिस्तानला भेट देण्याचा मोदी यांचा निर्णय मुत्सद्दीपणाचा आहे.

| December 26, 2015 02:32 am

मायदेशी परतताना लाहोरला काही वेळ थांबण्याचा मोदी यांचा निर्णय हा भारत व पाकिस्तानमधील ‘शिष्टाचारसंमत’ राजकारणापेक्षा वेगळ्या मार्गावर जाणारा असल्याचे सांगून भाजपने या भेटीचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐनवेळी दौऱ्यात बदल करून पाकिस्तानला भेट दिल्याबद्दल विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधानांनी खऱ्या मुत्सद्यासारखी कृती केली असून शेजाऱ्यांसोबतचे संबंध कसे असावेत हे दाखवून दिल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
‘पाकिस्तानला भेट देण्याचा मोदी यांचा निर्णय मुत्सद्दीपणाचा आहे. शेजाऱ्यांशी असेच संबंध असायला हवेत,’ असे पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटण्यासाठी मोदी लाहोरला गेल्याची बातमी कळल्यानंतर स्वराज यांनी ट्विटरवर लिहिले.
यापूर्वी मोदी यांनी शरीफ यांना वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या होत्या.
मायदेशी परतताना लाहोरला काही वेळ थांबण्याचा मोदी यांचा निर्णय हा भारत व पाकिस्तानमधील ‘शिष्टाचारसंमत’ राजकारणापेक्षा वेगळ्या मार्गावर जाणारा असल्याचे सांगून भाजपने या भेटीचे स्वागत केले. या भेटीसाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनापेक्षा अधिक योग्य दिवस असू शकत नव्हता, असेही पक्षाने म्हटले.
ज्याप्रमाणे जगात युरोपियन युनियन आणि ‘आसियान’ देशांमध्ये बघायला मिळते, तशी अनौपचारिकता या दोन शेजारी देशांनी त्यांच्या नात्यांमध्ये आणायला हवी, असे मत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले.या भेटीतून मोदी यांनी दोन्ही देशांमध्ये अधिक जवळच्या क्षेत्रीय सहकार्याचा संदेश दिला असल्यामुळे तिचे स्वागत करायला हवे. दोन्ही देशांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास केवळ या दोघांमध्येच नव्हे, तर संपूर्ण क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणारे संबंध निर्माण होतील असे पक्षाचे प्रवक्ते नलीन कोहली म्हणाले.भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनीही नवाझ शरीफ यांना भेटण्यासाठी लाहोरला जाण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले. दोन्ही देशांमधील नात्यामध्ये अनेक तणाव येऊन गेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बोलणी तसेच सुषमा स्वराज यांचा पाकिस्तान दौरा यामुळे कोंडी फुटली आहे. मोदी यांच्या भेटीमुळे हीच प्रक्रिया सुरू राहिली असल्याचे भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा म्हणाले. तर या दोन्ही देशांमध्ये सातत्याने व नियमितपणे संवाद सुरू राहावा, अशी अपेक्षा माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य मोहम्मद सलीम यांनी ट्विटरवर व्यक्त केले. भाजपने आजवर पाकिस्तानशी चर्चा करण्यास विरोध दर्शवला असताना आता ही मैत्री कशासाठी, असे विचारून आम आदमी पक्षाने या घडामोडीबाबत आश्चर्य व्यक्त केले. दहशतवादाच्या कारणासाठी भाजप व मोदी यांनी आतापर्यंत पाकिस्तानशी बोलण्यास विरोध केला होता, असे पक्षाचे नेते आशुतोष यांनी लक्षात आणून दिले.
मैत्री-विश्वासघात एकत्र कसे?
जनता दल (युनायटेड)ने मात्र, शेजारी देशाने सीमेवर शस्त्रसंधीचा भंग केल्याच्या आणि एका भारतीय जवानाचे शिर कापल्याच्या पाश्र्वभूमीवर या आकस्मिक भेटीमुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. मैत्री आणि विश्वासघात हे दोन्ही सोबत चालू शकत नाहीत. त्यामुळे ही बातमी ऐकून आपण सुन्न झालो, असे पक्षाचे नेते के. सी. त्यागी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:32 am

Web Title: narendra modi meet to pakistan
टॅग Narendra Modi
Next Stories
1 भारत-अफगाणिस्तान मैत्री काही देशांना खुपते
2 ‘यारी हैं इमान मेरा, यार मेरी जिंदगी..’
3 सरकारी धोरणे, निर्णयांबाबत लोकांना आता पंतप्रधानांचे एसएमएस
Just Now!
X