नरेंद्र मोदी यांचा पाक दौरा उत्स्फूर्त की उद्योजकाच्या मध्यस्थीने?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला अवचित भेट देऊन नियोजनबद्ध राजकीय मुत्सद्देगिरीला बगल दिली असली तरी त्यांची ही भेट उत्स्फूर्त नव्हे तर पूर्वनियोजितच होती आणि त्यामागे एका उद्योजकाचेच नाव वारंवार घेतले जात आहे. ते उद्योजक म्हणजे सज्जन जिंदाल. या ‘उत्स्फूर्त’ भेटीआधीही याच उद्योजकाने सार्क परिषदेदरम्यान काठमांडूत मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात तासाभराची चर्चा घडवून आणल्याचीही चर्चा होती. काँग्रेसनेही मोदी यांचा हा दौरा देशहितासाठी नव्हे तर व्यापारी हित जोपासण्यासाठी होता, अशी टीका केली आहे तर भाजप व संघ परिवारातील कडव्या नेत्यांची बोलतीही या दौऱ्याने बंद झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी सज्जन जिंदाल यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याची चर्चा आहे. त्यांनीच या उभय नेत्यांमधील भेटीत महत्त्वाची भूमिका निभावली अशी चर्चा दिल्लीच्या उच्चपदस्थ वर्तुळात सुरू आहे. अफगाणिस्तानहून परतताना मोदी लाहोरला जाऊन नवाझ शरीफ यांना भेटणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांपासून दोन्ही देशांतील प्रमुख मंत्र्यांना समजली ती ट्विटरवरून. खुद्द परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजदेखील या
भेटीबाबत अनभिज्ञ होत्या. ही भेट अचानक, शनिवारी सकाळी ठरल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र त्याची तयारी दहा दिवसांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी शरीफ यांचा वाढदिवस होता. त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी जिंदाल हे लाहोरला गेले होते. मात्र जिंदाल हे लाहोरभेटीच्या रणनीतीचा भाग नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात येते. असे असले तरी १४ डिसेंबर रोजीच मोदी-शरीफभेटीचा पाया रचला गेल्याचे सरकारमधील अत्यंत वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येते. त्या दिवशी सज्जन जिंदाल पाकिस्तानात होते. शरीफ यांचा वाढदिवस व त्यांच्या नातीचा विवाह एकाच दिवशी असल्याचा योग साधून लाहोरला जाण्याचा सल्ला मोदी यांना अजित डोवाल यांनी दिल्याचे समजते. तसा संदेश जिंदल यांच्याकरवी शरीफ यांना मिळाला आणि मग ही भेट निश्चित झाली. दरम्यान, अशा भेटींबाबत कमालीची गुप्तता बाळगली जाते, असे आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञांनी सांगितले.

काँग्रेसची टीका
मोदींची ही भेट भारताचे हित जोपासण्यासाठी नव्हे तर खासगी व्यापारी हितसंबंध जपण्यासाठी होती, अशी टीका काँग्रेसने केली आहे. पाकिस्तानी नेत्यांसोबत व्यापारी संबंध असलेल्या उद्योजकानेच ही भेट योजली होती आणि ती पूर्वनियोजित होती. गेल्या ६७ वर्षांत एकाही पंतप्रधानाने असे बेजबाबदार वर्तन केलेले नाही, असे काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले. मुंबई हल्ल्याचे सूत्रधार मोकाट फिरत असताना आणि दाऊदला परत आणता येत नसताना अशा ‘उत्स्फूर्त’ भेटींचा काय उपयोग, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

कोण आहेत सज्जन जिंदाल?
* सज्जन जिंदाल हे ‘जेएसडब्ल्यू स्टील’ या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या पोलाद कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचे धाकटे बंधू नवीन जिंदाल.
* ते काँग्रेसचे माजी खासदार आहेत. जून २०१४ मध्ये नवाझ शरीफ भारतभेटीवर आले असता, त्यांच्या सन्मानार्थ जिंदाल यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी चहापार्टीचे आयोजन केले होते.
* अफगाणिस्तानातील बामियान प्रांतातील खाणीतून कराची बंदरापर्यंत भूमार्गाने लोहखनिज आणण्याची परवानगी मिळावी याकरिता भारतातील पोलाद उत्पादक प्रयत्नशील आहेत.