१० वर्षांत भेट देणारे पहिले पंतप्रधान; ८० मिनिटांचा दौरा
रशिया व अफगाणिस्तान दौऱ्यावरून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला अचानक भेट देत दोन्हीही देशांमध्ये महिनाभरापासून सुरू झालेले सौहार्दपर्व अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला. सुमारे ८० मिनिटांच्या या अनपेक्षित भेटीमुळे मागील दहा वर्षांत पाकिस्तान दौरा करणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस आणि त्यांच्या नातीचा विवाह, हे निमित्त साधत मोदी यांनी पाकिस्तानला ही अवचित भेट दिली.
‘एअर इंडिया’च्या विशेष विमानाने सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी लाहोरच्या अल्लामा इक्बाल विमानतळावर लाल रंगाचा वेस्टकोट आणि शुभ्र कुर्ता-पायजमा या पेहरावात दाखल झालेल्या मोदी यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे आलिंगन देऊन स्वागत केले. त्यानंतर लाहोरजवळच्या रायविंद येथील शरीफ यांच्या राजेशाही प्रासादाकडे उभय नेते हेलिकॉप्टरने गेले.
शुक्रवारी शरीफ यांचा वाढदिवस होता, तर त्यांची नात मेहरुन्निसाचे लग्न होते. शरीफ यांनी मोदी यांना दूरध्वनी करून लग्नाचे निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमात मोदींसह इतर भारतीय पाहुण्यांसाठी विशेष मेजवानीचा घाट घालण्यात आला होता. दोन्ही देशांमधील विवाद्य मुद्दय़ांवर या वेळी उभयतांनी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा शरीफ यांच्या हेलिकॉप्टरने ते लाहोर विमानतळावर दाखल झाले. भारत-पाकिस्तानमधील संवादप्रक्रिया अनेक महिन्यांपासून ठप्प होती.
६ डिसेंबरला दोन्हीही देशांच्या संरक्षण सल्लागारांनी अनपेक्षितपणे एकमेकांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली होती. पॅरिस हवामान परिषदेतही मोदी व शरीफ यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान चर्चेसाठी आशादायक वातावरण तयार होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच मागील आठवडय़ात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही इस्लामाबाद दौरा केला होता. त्या पाश्र्वभूमीवर अचानक झालेली मोदी-शरीफ भेट दोन्हीही देशांदरम्यानचे संबंध सकारात्मक वळणावर घेऊन जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
कडेकोट बंदोबस्त
मोदी यांच्या आगमनाच्या वेळी विमानतळाचा ताबा पाकिस्तानी रेंजर्सनी घेतला होता. तसेच लाहोरपासून रायविंदपर्यंतच्या रस्त्यांवर वाहनांना प्रतिबंध करत सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले होते. शरीफ यांच्या प्रासादालादेखील कडेकोट बंदोबस्तातील किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.