नेपाळमधील सार्क परिषदेच्या समारोप बैठकीदरम्यान गुरूवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात औपचारिक शुभेच्छांची देवाणघेवाण झाली. भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर सार्कमध्ये मोदी आणि शरीफ यांच्यात कोणतीही चर्चा होणार नसल्याचे भारताकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरउद्दीन यांनी बुधवारीच दोन्ही देशांमध्ये चर्चेचा कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याचे सांगितले होते. पाकिस्तानकडून अशाप्रकारची कोणतीही विनंती भारताला करण्यात आली नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार बैठकीत सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी प्रादेशिक समस्यांवर चर्चा केली.
दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या ‘सार्क’ परिषदेतसाठी हजर राहिलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाकिस्तान वगळता अन्य सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केले नाही किंवा एकमेकांकडे पाहिलेही नव्हते. दोन्ही देशांत वाढलेल्या अंतराला भारत जबाबदार असून आता चर्चेची सुरुवात भारताकडूनच व्हावी, अशी अपेक्षा पाकिस्तानने व्यक्त केली होती.