केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी मोर्चाने दिल्लीत येऊन धडकलेले असतानाच या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक संधी मिळून त्यांचे प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केला.

ते म्हणाले की, शेतक ऱ्यांचे प्रश्न हे कायदे अमलात आल्यानंतर अल्पावधीतच सुटण्यास सुरुवात झाली आहे, त्यांना नवीन संधी व हक्कही प्राप्त झाले आहेत. त्यांनी याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उदाहरण दिले. या शेतकऱ्याने नवीन कायद्यातील तरतुदींचा फायदा घेऊन व्यापाऱ्याने दिलेल्या आश्वासनानुसार पैसे मिळवले आहेत. या शेतकऱ्याला संबंधित व्यापाऱ्याने पैसे वेळेत दिले नव्हते पण नवीन कायद्यातील तरतुदींचा वापर करून या शेतकऱ्याने हे पैसे मिळवले. कृषी व संबंधित क्षेत्रात कृषी सुधारणांमुळे संधीची नवी दारे खुली झाली आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने कधी ना कधी या कृषी सुधारणांचे आश्वासन दिले होते. आम्ही ते पूर्ण केले आहे. या सुधारणांमुळे शेतकरी मुक्त झाले आहेत. त्यांना नवे हक्क व संधी मिळाल्या असून नवीन कृषी कायदे झाल्यानंतर अल्पावधीतच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू लागले आहेत, असा दावा मोदी यांनी केली.

मोदी यांनी सांगितले की, लोकांनी बरोबर माहिती घ्यावी व अफवा तसेच गोंधळ निर्माण करणाऱ्यांपासून दूर रहावे. दोन शेतकऱ्यांनी अभिनव पद्धतीने शेती केल्याने त्यांचा बराच फायदा झाल्याचा दाखला त्यांनी दिला.

तीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्दय़ांवर मनोगत व्यक्त केले. १९१३ मध्ये वाराणसीतून चोरीस गेलेल्या माता अन्नपूर्णेच्या मूर्ती भारताने कॅनडातून परत आणल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

बाबासाहेब आंबेडकर यांची ६ डिसेंबरला पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने त्यांनी सांगितले की, राज्यघटनेने आपल्याला देशाप्रती जी कर्तव्ये सांगितली आहेत त्यांची पूर्तता करण्याचे वचन आपण दिले पाहिजे.

मोदी यांनी त्यांच्या भाषणात पक्षी तज्ज्ञ सलीम अली यांचा उल्लेख केला. पक्षी निरीक्षकांबाबत आपल्याला नेहमीच कौतुक वाटते. पक्षी निरीक्षणासाठी अनेक संस्था व गट काम करीत आहेत. त्यातून पक्षी जीवनाबाबत अधिकाधिक माहिती मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय होत असल्याचा दाखला देताना ते म्हणाले की, ब्राझीलमधील जोनास मॅसेटी यांनी त्यांच्या लोकांमध्ये वेद व गीता लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. संस्कृती लोकप्रिय करण्यासाठी ते तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. न्यूझीलंडमधील हॅमिल्टन पश्चिमचे खासदार गौरव शर्मा यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली त्यांच मोदी यांनी कौतुक केले. स्वदेशीसाठी अरबिंद यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

धुळ्याच्या शेतकऱ्यास लाभ

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्य़ातील शेतकरी जितेंद्र भोई यांनी विकलेल्या मक्याचे पैसे चार महिने त्यांना व्यापाऱ्यांनी दिले नव्हते, पण आता कृषी कायद्यातील तरतुदींमुळे त्यांना ते मिळाले आहेत.

शेतकरी व्हॉटसअ‍ॅप गट

राजस्थानातील बाराँ येथे कृषी उत्पादक संघटनेचे महंमद अस्लम यांनी व्हॉटस अ‍ॅप गट तयार केला असून त्याच्या माध्यमातून ते शेतमालाचे रोजचे बाजारभाव कळवतात. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

कृषी विद्यार्थ्यांना सल्ला

अनेक विद्यार्थी कृषीचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी खेडय़ात जाऊन शेतक ऱ्यांशी बोलावे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर अभिनव उपाय शोधून काढावेत, असे मोदी यांनी सांगितले.