मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाबरोबर तुलना केली. छळामुळे पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या अल्पसंख्यांकांना नागरिकत्व दिल्याबद्दल शिवराज सिंह चौहान यांनी मोदींचे कौतुक केले.

“देवाने तुम्हाला आयुष्य दिले, आईने तुम्हाला जन्म दिला पण नरेंद्र मोदीजी तुम्ही, त्यांना आदर आणि सन्मानाचं नवीन आयुष्य दिलं. नरेंद्र मोदी तुम्ही देवापेक्षा कमी नाहीत. हे खर नाही का?” असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी सिंधी आणि पंजाबी समुदायाच्या कार्यक्रमात उपस्थितांना विचारला. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भाजपाने मध्य प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी एक कार्यक्रम आयोजित केला होता. पाकिस्तानातून भारतात आश्रयला आलेल्या महिला, मुलींना कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले त्याची उदहारणे चौहान यांनी दिली. पाकिस्तानात भाविकांना मंदिरात जाऊ दिले जात नाही, महिलांवर बलात्कार केले जातात, मुलींचा जबरदस्तीने निकाह केला जातो. लग्नाला नकार देणाऱ्या मुलींची हत्या केली जाते असे चौहान म्हणाले.

“मी मुख्यमंत्री असताना, व्हिसाची मुदत संपली असली तरी, पाकिस्तानातून आश्रयाला आलेल्या लोकांवर कारवाई करु नका, असे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते असे त्यांनी सांगितले. “नरेंद्र मोदींचे अभिनंदन करा, अमित शाहंना वंदन करा” असे चौहान म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.