‘गांधी घराण्याच्या तीन पिढ्या अमेठीत साधा रेल्वेमार्ग टाकू शकल्या नाहीत,’ असा हल्लाबोल केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आज केला. त्या आज अमेठीमधील आयोजित एका सभेत बोलत होत्या.
लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींना आव्हान देणा-या स्मृती इराणींनी रविवारी अमेठीचा दौरा केला. यावेळी त्या म्हणाल्या की, अमेठीतील लोकांना अपेक्षित असलेली रेल्वे लाईन गांधी घराण्याच्या तीन पिढ्या आणू शकल्या नाहीत. तसेच अमेठीत सम्राट सायकल कारखान्यासाठी दिलेली ६५ एकरची जागा राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने शेतक्-यांकडून कवडीमोल किंमतीमध्ये विकत घेतली. त्यापैकी कोणाला नोकरी मिळाली?‘ असा सवालही इराणी यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामकाजाची माहितीही दिली. जोपर्यंत अमेठीतून गांधी कुटुंबाची विदाई होत नाही तोपर्यंत अमेठीचा विकास अशक्य आहे असेही त्यांनी नमूद केले.