देशात अनेक पक्ष एकत्र आले तरी त्यातून कमळ फुलण्यास मदत होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील किसान रॅलीत सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत अविश्वास ठरावाच्या वेळी मारलेल्या ‘अवांच्छित मिठी’ची त्यांनी खिल्ली उडवली.

मोदी म्हणाले, की आम्ही अविश्वास ठराव आणण्याचे कारण विचारले तर त्यांना ते सांगता आले नाही. त्यातूनच राहुल यांनी नको असलेले आलिंगन दिले. आपल्याकडे एकच दल (राजकीय पक्ष) नाही तर दलच दल आहेत. त्यामुळे ही सगळी दलदल (चिखल) आहे. त्यातून कमळ उगवणार आहे. सगळे पक्ष भाजपविरोधात एकजूट करायला पाहात आहेत. पण ते सगळे  गरीब, युवक व शेतकरी यांच्याकडे दुर्लक्ष करून खुर्चीमागे धावत आहेत. जितके जास्त पक्ष तितकी दलदल जास्त होऊन कमळच त्यातून उगवणार आहे. जर एका दलात दुसरे दल मिळवले तर दलदल होते. पण ती कमळाला उपकारक असते, कारण चिखलातूनच कमळ (भाजपचे निवडणूक चिन्ह) फुलत असते.

काल संसदेत घडले ते पाहून तुम्ही समाधानी आहात का, असा सवाल करून पंतप्रधान म्हणाले, की विरोधकांचा डोळा फक्त खुर्चीवर आहे. मी काही  चूक केली असेल तर सांगा. मी केवळ  गरीब व देशासाठी काम केले. भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला, तोच माझा गुन्हा आहे.