मध्य प्रदेशातील प्रचारात पंतप्रधानांची टीका

जनतेची फसवणूक करणे हे काँग्रेसच्या रक्तातच आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील प्रचारसभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

मध्य प्रदेशातील प्रचारात पंतप्रधानांनी काँग्रेसवर जनतेची दिशाभूल करत असल्याचा उल्लेख केला. एकीकडे मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गोमातेचा उल्लेख आहे. दुसरीकडे हाच पक्ष केरळमध्ये रस्त्यावरच गोहत्या करून गोमांस खातो हा विरोधाभास अशी टीका पंतप्रधानांनी केली. त्यांचा संदर्भ गेल्या वर्षी कन्नूरमध्ये रस्त्यावरच वासराची हत्या करण्यात आल्याचा होता. केंद्र सरकारने लाभार्थीच्या खात्यात थेट रक्कम जमा करून प्रतिवर्षी ९० हजार कोटी रुपये वाचविल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेस नेते माझ्याबाबत अपशब्द वापरतात, मात्र त्या मागचे कारण मला माहीत आहे असा टोला मोदींनी लगावला. पंतप्रधानांनी स्थानिक खासदार व काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले. २३० सदस्य असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेसाठी २८ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.