मोदी सरकारची नवी घोषणा २६ जानेवारीला?

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासह कृषी क्षेत्रासाठी मोठय़ा प्रमाणावर सवलती देण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार करीत आहे. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये १० हजार रुपये जमा करण्याच्या विचारात असून ही रक्कम बियाणे, शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे. योजनेची घोषणा २६ जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ओदिशा सरकारच्या या प्ररूपावर मोदी सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, वित्त आणि कृषी मंत्रालयात यावर चर्चा सुरू आहे. ओदिशामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी १० हजार रुपये राज्य सरकारकडून भरण्यात येतात, त्यापोटी राज्य सरकारवर १.४ लाख कोटी रुपयांचा बोजा पडतो. मात्र केंद्राच्या योजनेमध्ये सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा समावेश होणार नसल्याची शक्यता आहे. या योजनेतून भूमिहीन शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. भूमिहीन शेतकऱ्यांवर कर्ज नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात येत आहे. मोदी सरकारने प्रत्येक राज्यातून आणि मंत्रालयांकडून शेतकऱ्यांची आकडेवारी मागितली आहे. तेलंगण प्रारूपाचाही विचार होत आहे.