पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षाच्या सुरुवातीला एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पकोडा विकणे हा सुद्धा एक रोजगारच आहे असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेसने भरपूर तोंडसुख घेतले होते. पण नरेंद्र मोदींच्या या विधानाने गुजरातमधील एका काँग्रेस कार्यकर्त्यांचे आयुष्य बदलून टाकले आहे. गुजरातमध्ये राहणारे नारायणभाई राजपूत हे काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी हिंदी साहित्यातून पदवी घेतली आहे.

नारायणभाईंनी नरेंद्र मोदींची ती मुलाखत पाहिल्यानंतर त्यांना पकोडे विक्रीची कल्पना सुचली. त्यांनी सर्वातआधी वडोदऱ्यामध्ये श्रीराम डाळवडा सेंटर हे पकोडे विक्रीचे दुकान सुरु केले. आज गुजरातमध्ये त्यांच्या मालकीच्या ३५ फ्रेंचायजी आहेत. नरेंद्र मोदींची मुलाखत पाहिल्यानंतर आपल्याला पकोडे विक्रीची कल्पना सुचली हे नारायणभाई प्रामाणिकपणे मान्य करतात. दिवसाला पकोडे विकून २०० रुपये कमावणे बेरोजगार असण्यापेक्षा केव्हाही चांगले असे नरेंद्र मोदींचे मत होते.

मी वडोदऱ्यामध्ये १० किलो साहित्य वापरुन पहिला पकोडे विक्रीचा स्टॉल सुरु केला. आज मी ५०० ते ६०० किलो साहित्य वापरुन पकोडे बनवतो असे त्यांनी सांगितले. मी कट्टर काँग्रेस कार्यकर्ता असून पुढच्या जन्मातही काँग्रेसीच राहीन असे नारायणभाई राजपूत यांनी सांगितले.

नारायणभाईंना या धंद्यात उत्तम यश मिळाले. वडोदऱ्यात दोन महिन्यात त्यांचे दुकान पकोडयासाठी ओळखले जाऊ लागले. त्यांच्याकडे १० रुपयाला १०० ग्रॅम डाल पकोडे मिळतात. सकाळी सात ते अकरा या वेळेत त्यांच्या स्टॉलवर ३०० किलो डाळवडे विकले जातात.