ओबामा प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेसमधील भाषणाचे नामकरण
अमेरिकी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचे नामकरण ‘मोदी तत्त्वज्ञान’ असे करण्यात आले आहे. ओबामा प्रशासनातील परराष्ट्र खात्याच्या सहमंत्री (दक्षिण व मध्य आशिया) निशा देसाई बिस्वाल यांनी ही माहिती दिली.
अमेरिकी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करताना मोदी यांनी अमेरिका व भारत यांच्यातील समान दुवे, द्विपक्षीय संबंध, व्यापार, सुरक्षा, सामरिक रणनीती या विषयांवर भर देतानाच दहशतवादाच्या मुद्दय़ावरही भर दिला होता. मोदी यांच्या भाषणाला अमेरिकी खासदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पाश्र्वभूमीवर येथे हेरिटेज फाऊंडेशन व इंडिया फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मोदीभेटीचे सुरक्षा व सामरिक फलित’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना निशा देसाई बिस्वाल यांनी मोदी यांच्या या भाषणाला ओबामा प्रशासनाने ‘मोदी तत्त्वज्ञान’ असे नाव देत त्यांचा उचित गौरव केला असल्याचे स्पष्ट केले.
मोदी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान भारत-अमेरिका मैत्रिसंबंधांवर भर दिला. उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांमुळे आशिया ते आफ्रिका खंडांत शांतता, समृद्धी आणि स्थिरत्व यांचे मार्गक्रमण योग्य गतीने होईल तसेच हिंदा महासागर ते प्रशांत महासागरापर्यंत सागरी सुरक्षेचे महत्त्व वाढून सागरी मार्गाने होणारा व्यापार व मुक्त संचार वृद्धिंगत होईल, असे आश्वस्त करणारे मोदी यांचे भाषण होते, असे निशा देसाई बिस्वाल यांनी नमूद केले. भारत हा अमेरिकेचा मित्रदेश असून ओबामा प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणात भारताला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे बिस्वाल म्हणाल्या. भारतातील अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनीही मोदी यांनी संयुक्त अधिवेशनात मांडलेल्या विचारांचे कौतुक करताना अमेरिका कायमच उभय देशांतील मैत्रितत्त्वाचे काटेकोर पालन करेल असे स्पष्ट केले.