राजनैतिक संबंध दृढकरण आणि राष्टांसोबत मैत्रीपूर्ण संबंध जपण्याच्या पार्श्वभूमीवर परदेश दौऱयांसाठी उत्सुक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला दौरा भूतान येथे होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूतान दौऱयाचे आयोजन आणि या दौऱयासंबधिची पाहणी करण्यासाठी उद्या(शुक्रवार) अधिकाऱयांचे एक पथक भूतानला रवाना होणार असल्याचे समजते.
सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनानंतर पंतप्रधानांचा हा दौरा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदींचा परदेश दौऱयाच्या कार्यक्रमाची आखणी केली जात आहे. यामध्ये पहिला दौरा भूतानला करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच भूतानसोबत नेपाळ, बांग्लादेश आणि अफागाणिस्तानही पंतप्रधानांच्या शेजारी राष्ट्रांच्या दौऱयातील पर्याय असू शकतात. गेल्या १३ वर्षांपासून कोणताही पंतप्रधान नेपाळ दौऱयावर गेलेला नाही त्यामुळे यावेळी नेपाळ दौऱयालाही पंतप्रधान प्राधान्य देण्याची दाट शक्यता आहे.