पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय असून मोदींनीच पाकिस्तानमध्ये जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गळाभेट घेतली होती, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर पलटवार केला आहे.

पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केले होते. या हल्ल्यात ३५० दहशतवादी मारले गेले, असा दावा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला होता. मात्र, नेमके किती दहशतवादी मारले गेले याचा आकडा सरकारने दिला नाही. काँग्रेसने या मुद्द्यांवरुन भाजपा व नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसच्या या टीकेला खुद्द मोदींनीच प्रत्युत्तर दिले होते. काँग्रेस नेते पाकिस्तानचे पोस्टर बॉय असल्याचे मोदींनी म्हटले होते. तर भाजपा नेत्यांनी पुढच्या वेळी पुरावे शोधायला काँग्रेस नेत्यांनाच पाकिस्तानमध्ये पाठवले पाहिजे, असे म्हटले होते.

या टीकेसंदर्भात गुरुवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुल गांधी म्हणाले, नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त आम्ही पाकिस्तानमध्ये गेलो होतो का?, पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पथकाला पठाणकोट तळावर कोणी प्रवेश दिला?. नरेंद्र मोदींनीच त्यांच्या शपथविधी सोहळ्यात नवाझ शरीफ यांना बोलावले होते. शरीफ यांची गळाभेट घेणारेही मोदीच होते. नरेंद्र मोदीच पाकिस्तानचे पोस्टरबॉय आहेत, असा पलटवार राहुल गांधी यांनी केला.