मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राजधानीतील कस्तुरबा गांधी रस्त्यावरील नव्या भव्य महाराष्ट्र सदनामध्ये देशाचे पंतप्रधान प्रथमच येणार आहेत. त्याचबरोबर किमान तेरा राज्यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि बडे केंद्रीय मंत्रीही नव्या महाराष्ट्र सदनात येत्या शनिवारी (दि. २७) दिवसभर उपस्थित असणार आहेत. या माहितीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला.

निमित्त आहे ते भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे. सर्वसाधारणपणे अशी बैठक एक तर ‘११, अशोका रोड’ या पक्ष कार्यालयात होते किंवा संसद परिसरासारख्या अत्यंत सुरक्षेच्या ठिकाणी होत असते. मात्र, हा पायंडा बदलून प्रथमच एखाद्य राज्याच्या सदनामध्ये आयोजित केली आहे आणि त्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत नवे महाराष्ट्र सदन भव्य, शानदार आणि एखाद्य राजवाडय़ासारखे आहे. सदनाच्या उदघाटनासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले होते; पण मोदींच्या रूपाने प्रथमच पंतप्रधान येत आहेत. या बैठकीचे यजमानत्व फडणवीस यांच्याकडे आहे.

भाजपच्या राज्याराज्यांतील सूकाणू समितीच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. ही बैठक पक्षाच्या सुशासन विभागातर्फे आयोजित केली असून तिचे निमंत्रक खासदार विनय सहस्रबुद्धे आहेत. पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये समन्वय साधणे आणि एकमेकांच्या चांगल्या योजनांची माहिती देणे, असा मुख्य हेतू यामागे आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथसिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, सुषमा स्वराज आदी प्रमुख केंद्रीय मंत्री अपेक्षित आहेत.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था

दस्तुरखुद्द पंतप्रधान आणि तेरा मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री येणार असल्याने नव्या महाराष्ट्र सदनाला किल्लय़ाचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. त्यदृष्टीने बुधवारी पंतप्रधानांच्या विशेष सरंक्षण गटाच्या (एसपीजी) आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने महाराष्ट्र सदनची तपशीलवार पाहणी केली. दुसरीकडे या बैठकीने सदनामध्ये निवासाचे आगाऊ  बुकिंग केलेल्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तशी गडबड होऊ  नये, याकरीता भाजप खासदारांच्या नावाने सदनातील बहुतेक खोल्यांचे बुकिंग केल्याचे समजते. अपरिहार्य मंडळींना कोपर्निकस मार्गावरील जुन्या सदनात हलविले जाणार आहे.