गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर बुधवारी प्रथमच एका कार्यक्रमात मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी येथे एकाच व्यासपीठावर आले. उभय नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्याचे सर्व उपस्थितांनी पाहिले असले तरी त्यामध्ये केवळ औपचारिकता होती, प्रेमाच्या ओलाव्याचा प्रकर्षांने अभावच जाणवत होता, अशी चर्चा ऐकावयास मिळत होती.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन अडवाणी यांनी स्वागत केले. चौहान यांनी त्यानंतर अडवाणी यांना वाकून नमस्कार केला तेव्हा अडवाणी यांनी त्यांना आशीर्वाद दिला. मात्र त्यानंतर मोदी यांनी वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला असता अडवाणी यांनी त्याला थंडपणे प्रतिसाद दिला. मोदी यांच्याकडे न पाहताच अडवाणी यांनी केवळ सोपस्कार म्हणून हात जोडले.
नरेंद्र मोदी सध्या देशभर दौरे करून सरकारवर घणाघाती टीका करीत आहेत. असे असतानाही अडवाणी आपल्या भाषणात म्हणाले की, भाजप पक्ष आज ज्या स्तरापर्यंत पोहोचला आहे तो घणाघाती भाषणांच्या आधारावर नव्हे तर पक्ष कार्यकर्त्यांच्या अविश्रांत मेहनतीचे हे फळ आहे. केवळ घणाघाती भाषणांवर नव्हे तर आपण जे कार्य केले आहे त्या आधारावरच आपल्याला विजय मिळणार आहे, असेही अडवाणी म्हणाले.
केंद्रातील एनडीए सरकार आणि देशात ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे त्यांच्या कामगिरीचेही अडवाणी यांनी कौतुक केले. मोदी यांची स्तुती करतानाच त्यांनी शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचेही कौतुक केले.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांची निवड करण्यात आल्याचा विशेष उल्लेख या वेळी अडवाणी यांनी केला. उपस्थितांनी मोदी यांच्या नावाचा जयघोष सुरू केल्याने अडवाणी यांनी आपले भाषण आवरते घेतले.