ओसाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जपानचे पंतप्रधान शिजो आबे यांच्याशी जागतिक अर्थव्यवस्था, आर्थिक गैरव्यवहार करून फरार झालेले आरोपी, आपत्कालीन व्यवस्थापन या विषयांवर चर्चा केली. ऑक्टोबर महिन्यात सम्राट नारुहितो यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहतील, असेही मोदी यांनी या वेळी जाहीर केले.

जी २० शिखर परिषदेसाठी आलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी आभार मानले. रेइवा पर्वाची सुरुवात झाल्याबद्दल मोदी यांनी आबे आणि जपानच्या जनतेचे अभिनंदन केले. नव्या पर्वासाठी रेई आणि वा या दोन शब्दांनी तयार झालेली रेइवा ही संज्ञा आहे.

या भेटीबाबत परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, दोन्ही पंतप्रधान एकमेकांचे चांगले मित्र असून त्यांच्यात परस्पर संबंधांबाबत रचनात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. अबे यांनी जी२० परिषदेकडून काय अपेक्षा आहेत त्या मुद्दय़ावर चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली, असे गोखले म्हणाले.