पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून यावेळी एक मजेशीर दृश्य पहायला मिळालं. नरेंद्र मोदी शांती निकेतन येथे विश्व भारती विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. जेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर शांती निकेतना पोहोचलं तेव्हा स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहोचू शकल्या नव्हत्या. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी मोदींचं स्वागत केलं. मोदींनी पाहिलं तर काही अंतरावर ममता बॅनर्जी येताना दिसत होत्या. उशीर झाला असल्याने त्या घाईत होत्या.

वेगाने चालत येत असलेल्या ममता बॅनर्जींनी समोर रस्ता खराब असल्याचं पाहिलं नव्हतं. नरेंद्र मोदींना त्यांना इशारा करत रस्ता खराब असून पुढून या असा इशारा करत योग्य मार्ग दाखवला. यानंतर ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी उपस्थित राहणं हा प्रोटोकॉल आहे.

नरेंद्र मोदींच्या या वागण्याचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारविरोधात ममता बॅनर्जी विरोधकांची एकजूट करत २०१९ मध्ये भाजपाचा विजयरथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची एकजूट दिसून आली होती.