पंतप्रधानांचे रालोआ सदस्यांना आवाहन; शिवसेनेला बैठकीचे निमंत्रणच नाही
नव्या पीक विमा योजनेखाली जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) खासदारांना मंगळवारी केले. तर कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या दूर होण्यास यामुळे मदत होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.
भाजपचे खासदार आणि शिवसेना वगळता अन्य घटक पक्ष यांच्या बैठकीत मंगळवारी जेटली यांनी अर्थसंकल्पावर सविस्तर भाष्य केले. पायाभूत सुविधा, व्यवसाय आणि गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करून आर्थिक वाढीला चालना देण्याचा प्रयत्न आहे, असेही जेटली म्हणाले.
सुरक्षित समाजासाठी केंद्र सरकार सर्व प्रयत्न करीत आहे, आरोग्य विम्यासारखी पावले उचलण्यात आली असल्याचेही जेटली यांनी या वेळी खासदारांना सांगितले.
तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या एप्रिल-मे महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका असून त्यावेळी या अर्थसंकल्पाचा आपल्याला लाभ होईल, अशी भाजप आणि घटक पक्षांची अपेक्षा आहे. सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढता येईल, असेही भाजप आणि घटक पक्षांना वाटत आहे. तर पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
जवळपास एक तास सुरू असलेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी काही वेळासाठी हस्तक्षेप केला. पंतप्रधान पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी खासदारांनी प्रयत्न करण्याची सूचना मोदी यांनी या वेळी केली. आपल्या मतदारसंघात हे आव्हान म्हणून स्वीकारा, असे आवाहन त्यांनी रालोआच्या खासदारांना केले.
या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हजर होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागाच्या हिताचा अर्थसंकल्प असल्याचे या वेळी नमूद केले.
जेएनयूचा मुद्दाही या वेळी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मांडला आणि विरोधकांचे आरोप खोडून काढण्याचे आवाहन केले.

शिवसेनेचे खासदार अनुपस्थित
शिवसेनेचे खासदार या बैठकीला उपस्थित नव्हते. आपल्याला बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, असे शिवसेनेने स्पष्ट केले. संपर्काच्या अभावामुळे निमंत्रण देण्यात आले नसावे, अशी सारवासारव खासदार आनंद अडसूळ यांनी केली.