मोदींचा मंत्र्यांना मंत्र, साडेपाच तासांच्या बैठकीत कामगिरीचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दर गुरूवारी घेत असलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक यावेळी मात्र मंत्र्यांची धाकधूक वाढविणारी ठरली. कारण या बैठकीस असलेली मंत्रिमंडळाच्या फेरबदलची पाश्र्वभूमी. सुमारे साडेपाच तास चाललेल्या या बैठकीमध्ये मोदी यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा तपशीलवार आढावा घेतानाच, काही मंत्रालयांच्या कामांमध्ये गती येण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्याचबरोबर मंत्र्यांनी नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन काम करावे, असा नवा मंत्रही दिला.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये फक्त कॅबिनेट मंत्रीच उपस्थित असतात.मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधानांनी महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात संपूर्ण मंत्रिमंडळाचीच बैठक (म्हणजे राज्यमंत्र्यांसह) बोलावण्याचा प्रघात पाडला आहे. काही ज्येष्ठ मंत्र्यांचा अपवादवगळता अन्य मंत्र्यांनी आपापल्या खात्याच्या कामगिरीचे, एकंदर ११३ पानांचे सादरीकरण यावेळी केले. सर्व खात्यांच्या सचिवांनाही या बैठकीमध्ये पाचारण करण्यात आले होते.  दोन वर्षांत काय कामगिरी केली? कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयांची कितपत अंमलबजावणी झाली? उपलब्ध निधीपैकी किती खर्च झाला? कामगिरी होत असल्याचा दावा असेल तर ती जनतेपर्यंत पोचविण्यात कितपत यश आले? पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांशी कितपत संवाद ठेवला, अशी चर्चा झाली, अशी माहिती सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. या बैठकीत मोदी नेहमीप्रमाणे फारसे बोलले नाहीत. मात्र काही वेळा त्यांनी टोकदार प्रश्न विचारले.

कुणाला नारळ, कुणाला प्रसाद?

जुलैच्या पहिल्या आठवडय़ात अपेक्षित असलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाचा आधार म्हणून या आढावा बैठकीकडे पाहिले जात आहे. समाधानकारक कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना नारळ किंवा खातेबदल करण्यात येणार असल्याचे स्पष्टच आहे. अशा मंत्र्यांमध्ये विधी व कायदा मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा, अतिसूक्ष्म-लघु- मध्यम उद्य्ोग खात्याचे राज्यमंत्री गिरीराज सिंह, रसायने आणि खते खात्याचे राज्यमंत्री निहाल चंद आदींच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय पंचाहत्तरीची लक्ष्मणरेषा पूर्ण करणाऱ्या अल्पसंख्य विकास खात्याच्या मंत्री नजमा हेफतुल्ला यांची राज्यपालपदी (किंवा अगदी उपराष्ट्रपतीपदी) वर्णी लावणार असल्याचे सांगितले जाते.  कलराज मिश्रा यांनीही पंचाहत्तरी ओलांडली आहे; पण उत्तर प्रदेशातील निवडणुकीमुळे त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता कमी आहे. समाधानकारक कामगिरी नसणाऱ्या; पण प्रभावशाली असलेल्या काही मंत्र्यांची खाती बदलण्याचीही शक्यता आहे. त्यामध्ये कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. तशीच उत्सुकता अन्न व नागरी पुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री रामविलास पासवान यांच्याबाबतही आहे.उत्तम कामगिरी करणाया उर्जा व कोळसा खात्याचे राज्यमंत्री पियूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आदींना बढती मिळण्याची शक्यता आहे. अधूनमधून वादग्रस्त वक्तव्ये करणारे पर्यटन, संस्कृती आणि नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा,  राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनाही उत्तर प्रदेशमधील निवडणुकीमुळे बढती मिळण्याची चिन्हे आहेत.