पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ८ जूनला अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात भाषण होणार असून, त्याबाबत भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांची उत्कंठा वाढली आहे. अभ्यागत सज्जात हे भाषण ऐकण्यासाठी बसायला मिळावे यासाठी तिकिटांची मागणी अमेरिकी काँग्रेस सदस्यांकडे केली जात आहे. अनेक भारतीयांना तिकिटेच मिळाली नाहीत त्यामुळे ते निराश झाले आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी वेगवेगळय़ा राज्यातून येणार आहेत. आमच्यासाठी एक स्वप्न साकार झाले आहे, असे शिकागो येथील भारत बराई यांनी सांगितले. मोदी यांचे भाषण ऐकल्यानंतर ते भारत-अमेरिका मैत्रीला किती महत्त्व देतात हे अमेरिकी काँग्रेस सदस्यांना लक्षात येईल असे ते म्हणाले. सिलिकॉन व्हॅलीतील यशस्वी उद्योजक एम. आर. रंगास्वामी यांनी सांगितले, की हे भाषण मी पाहणार आहे, त्यासाठी कॅलिफोर्नियातून कॅपिटॉल हिल येथे येत आहे. रंगास्वामी हे सिलिकॉन व्हॅलीतील भारतीय समुदायाच्या संघटनेचे संस्थापकही आहेत. अमेरिकी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले, की लोकांना मोदींच्या भाषणाची तिकिटे नाकारताना आम्हाला नाकीनऊ आले आहे. प्रत्येक काँग्रेस सदस्यामागे एक तिकीट देण्यात आलेले आहे. सर्वानाच तिकिटे मिळणे शक्य नसल्याने आवारातच एक तंबू टाकून भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांना भाषण पाहण्याची सोय करण्याचा विचार चालू होता, पण अमेरिकी काँग्रेसच्या शिष्टाचारामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. सी स्पॅन या केबल अँड सॅटेलाईट नेटवर्कवर या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. भारतीय वंशाते स्वदेश चटर्जी यांनी सांगितले, की अमेरिकेने मोदी यांना संयुक्त अधिवेशनात भाषणाचे निमंत्रण देणे ही मोठी गोष्ट आहे. पोखरण अणुचाचण्यांनंतर भारत व अमेरिका यांचे बिघडलेले संबंध सुधारण्यात चटर्जी यांची मोठी भूमिका होती. भारतीय वंशाच्या अमेरिकी व्यक्तींनी अनेक महिने मनधरणी करून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे अमेरिकी काँग्रेसमधील भाषण १४ सप्टेंबर २००० रोजी ठरवण्यात आले होते. या वेळी तसे काहीच झाले नाही. अमेरिकी काँग्रेस सदस्यांनीच प्रतिनिधिगृहाच्या सभापतींना पत्र पाठवून मोदी यांना निमंत्रित करण्यास सांगितले. रायन यांनी लगेच मोदी यांना निमंत्रण पाठवले असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मनमोहन सिंग यांचे संयुक्त अधिवेशनात १९ जुलै २००५ रोजी भाषण झाले होते. त्या आधी अटलबिहारी वाजपेयी (१४ सप्टेंबर २०००), पी. व्ही. नरसिंहराव (१८ मे १९९४) व राजीव गांधी (१३ जुलै १९८५) यांचीही भाषणे झाली होती. मोदी यांची सभापती पॉल रायन, अल्पसंख्याक नेत्या नॅन्सी पेलोसी, सीनेटचे बहुसंख्याक नेते मिच मिककॉनेल व सीनेटचे अल्पसंख्याक नेते हॅरी रीड यांच्याशी चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदी यांचे अमेरिकी काँग्रेसमध्ये भाषण होईल.