भोपाळमध्ये ‘शौर्यस्मारका’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे प्रतिपादन

आमचे जवान बोलत नाहीत तर कृती करतात आणि अगदी त्याचप्रमाणे आमचे संरक्षणमंत्रीही बोलत नाहीत तर कृती करतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भोपाळ येथे ‘शौर्य स्मारका’च्या उद्घाटनप्रसंगी केले.

लक्ष्यभेदी हल्ले आमच्याच सरकारने प्रथम कसे केले, असे पर्रिकर अनेक कार्यक्रमांतून वारंवार सांगत असताना मोदी यांनी पर्रिकर यांच्या  मितभाषीपणाचे कौतुक केले. सीमेवर पहारा ठेवणाऱ्या जवानांची इच्छा देशवासियांना सुखाने झोपता यावे, ही असते. मात्र ज्या वेळी आपण जागे राहिले पाहिजे त्यावेळी आपण झोपलो तर हे जवान आपल्याला क्षमा करणार नाहीत. त्यामुळे यापुढे बेसावध राहून कधीच चालणार नाही, असेही मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले की, आमच्या जवानांचा विषय निघाला की आपल्या डोळ्यासमोर त्यांचा गणवेषातील रूबाब येतो, त्यांच्या शौर्यकथा आठवतात, पण नैसर्गिक संकटांत त्यांच्यातल्या सहृदयतेचे जे दर्शन घडते त्याचेही स्मरण राहिले पाहिजे. काश्मीरमधील पूरस्थिती असो किंवा येमेनमधील यादवीत सापडलेले भारतीय आणि पाकिस्तानीही असोत; भारतीय जवानांनी त्या संकटांतून लोकांना वाचविले होते.

अनेक देशांत जवान समोर आले की लोक आदराने उभे राहातात आणि त्यांना सलाम करतात. आपल्या देशातही ही प्रथा यावी. रेल्वेस्थानक, विमानतळ, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी जवान समोर दिसल्यावर त्यांना  नागरिकांनी आदरपूर्वक नमस्कार केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काश्मिरात पुन्हा हल्ला

श्रीनगरच्या वेशीवर झाकुरा भागात अतिरेक्यांनी चढविलेल्या हल्ल्यात सशस्त्र सेना दलाच्या गस्तीपथकातील एक जवान धारातीर्थी  पडला तर  एका पोलिसासह आठजण जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जवानांनी प्रत्युत्तर दिले, पण हल्ला झाला तेव्हा नागरिकांचीही वर्दळ होती त्यामुळे सुरक्षा दलांना अतिरेक्यांवर आक्रमक गोळीबार करता आला नाही. संपूर्ण परिसराची तात्काळ नाकाबंदी करण्यात आली असून व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.