नरेंद्र मोदींनी विजय मल्ल्याचं नाव न घेता घोटाळा करुन पळून गेलेले ट्विटरवर रडत आहेत असं सांगत विरोधकांना उत्तर दिलं आहे. आम्ही तसा कायदा केला. तुम्ही लुटत आहेत त्यांना लुटू दिलंत असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला सुनावलं. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना नरेंद्र मोदींनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी विरोधकांनी आर्थिक घोटाळा करुन फरार झालेल्यांचा उल्लेख केला. यावर बोलताना नरेंद्र मोदींनी हे उत्तर दिलं.

गेल्या आठवड्यात देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून विदेशात पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने त्याची १३ हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त केल्याचा दावा केला . मल्ल्याने एकापाठोपाठ एक ट्विट करत आपले सरकारवरील आपला रोष व्यक्त केला. कायदेशीर शुल्काच्या रूपात संपत्तीच्या होत असलेल्या बेसुमार वापरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

मी रोज सकाळी उठल्यानंतर पाहतो की डीआरटीच्या (कर्ज वसुली लवाद) अधिकाऱ्यांनी माझी आणखी एक संपत्ती जप्त केलेली असते. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचे मूल्य १३ हजार कोटी रूपयांहून अधिक आहे. बँकांनी दावा केला आहे की, सर्व प्रकारचे व्याज मिळून त्यांचे ९ हजार कोटी रूपये थकबाकी आहेत. याचे आता समीक्षण केले जावे. हे आणखी कितीपर्यंत जाईल ? हे योग्य आहे का, असा सवाल करणारे ट्विट मल्ल्याने केले होते.

डीआरटीच्या वसुली अधिकाऱ्यांनी भारतात बँकांकडून नुकताच माझ्या समूहाची १३ हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मी ९ हजार कोटी घेऊन पळून गेल्याचे सांगितले जाते. यामुळे सरकारी बँकांचे नुकसान झाल्याचे म्हटले जाते. मग हा न्याय निष्पक्ष आहे का ? असा सवालही त्याने विचारला होता.