भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

बहारिनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असलेले मोदी यांनी शनिवारी रात्री  बहारिनच्या राजांची भेट घेतली असता त्यांना हा गौरवास्पद पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने मला माझा मोठा सन्मान झाल्याचे वाटत आहे.

बहारिनच्या राजांच्या माझ्याबद्दल व माझ्या देशाबद्दल असलेल्या मैत्रीभावनेमुळे माझा तितकाच सन्मान झाला आहे. १३० कोटी भारतीयांच्या वतीने मी हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारतो. हा संपूर्ण भारताचा सन्मान आहे. बहरैन साम्राज्य व भारत यांच्यातील घनिष्ठ व मैत्रीपूर्ण संबंधांना मिळालेली ही मान्यता आहे. हे संबंध हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, असे मोदी म्हणाले.

भारत व  बहारिन यांनी सहकार्याची नवे क्षेत्रे जोडण्याचे आणि द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचे मान्य केले आहे, याचा मोदी यांनी उल्लेख केला. भारतीय वंशाचे लोक हे बहरैनमधील सर्वात जास्त संख्येतील परदेशी नागरिक आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.  या लोकांचे येथे मनापासून स्वागत केले जाते. त्यांची काळजी घेत असल्याबद्दल मी  बहारिनच्या नेतृत्वाचे आभार मानतो, असे पंतप्रधानांनी म्हटल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले.

मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त अडीचशे भारतीय कैद्यांना माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहारिन भेटीनिमित्त तेथे विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या २५० भारतीय  कैद्यांना माफी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयाबाबत बहारिनच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. अधिकृत माहितीनुसार परदेशांतील तुरुंगात सध्या एकूण  ८१८९ भारतीय व्यक्ती शिक्षा भोगत असून त्यात सौदी अरेबियातील भारतीय कैद्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे १८११, तर संयुक्त अरब अमिरातीत १३९२ आहे. बहारिनमध्ये एकूण किती भारतीय लोक तुरुंगात आहेत हे समजलेले नाही. मानवतावादी तत्त्वावर बहारिन सरकारने २५० भारतीय कैद्यांना माफी दिली  असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.  या निर्णयाबाबत पंतप्रधान मोदी यांनी बहारिनचे राजे व राजपरिवाराचे आभार मानले.