मोदी आणि मे यांच्यात चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांना ऊर्जा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या ब्रिटनमधील समपदस्थ थेरेसा मे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली  असून, त्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांना ब्रेक्झिटनंतरच्या कालखंडात नवी ऊर्जा मिळणार आहे. दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवा आयाम मिळाला आहे, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

१० डाऊनिंग स्ट्रीटने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दोन्ही नेत्यांत सीरिया हवाई हल्ले, दहशतवाद विरोधी उपाययोजना, मूलतत्त्ववाद, ऑनलाइन दहशतवाद, गुप्तहेरांवर विष प्रयोगाबाबत रशियाविरोधी भूमिका यासह काही मुद्दय़ांवर चर्चा झाली. ब्रेक्झिटनंतरही भारताच्या दृष्टीने ब्रिटनचे महत्त्व कमी झालेले नाही, लंडन शहर हे आमच्यासाठी जागतिक बाजारपेठ मिळवण्याचे एक ठिकाण आहे. ते स्थान कायम राहील, असे मोदी यांनी सांगितले.

जून २०१६ मध्ये ब्रेक्झिट मतदानानंतर ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भारत व ब्रिटन या दोन्ही देशात काही करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार असून बेकायदा स्थलांतरितांबाबत समझोता कराराची मुदत २०१४ मध्ये संपली असल्याने तो पुन्हा नव्याने केला जाणार आहे. दरम्यान, कथुआ बलात्कार व हत्या तसेच गौरी लंकेश हत्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ लंडमध्ये निदर्शने करण्यात आली.

* थेरेसा मे यांनी ब्रेग्झिट प्रक्रियेतील प्रगतीची माहिती दिली.

* मार्चमध्ये मान्य करण्यात आलेल्या अंमलबजावणी कालावधीत भारतीय कंपन्या व गुंतवणूक दार यांना सध्याच्याच अटींवर बाजारपेठ प्रवेश दिला जाईल असा निर्वाळा मे यांनी दिला.

* गेल्या वर्षी भारतीय तुरूंगातून सोडण्यात आलेल्या सहा माजी ब्रिटिश सैनिकांच्या (चेन्नई सिक्स) परत पाठवणीचे पंतप्रधान मे यांनी स्वागत केले.