देशभरात नरेंद्र मोदींना फक्त अरविंद केजरीवालच भ्रष्टाचारी आहे असे वाटते. बाकीचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का? हा प्रश्न विचारला आहे दस्तुरखुद्द अरविंद केजरीवाल यांनीच. आपच्या २० आमदारांना लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी राष्ट्रपतींनी अपात्र ठरवले त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ही टीका केली आहे.

आधी सीबीआयमार्फत धाड घालून मला सतावलेत. पण तुमच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर आमच्या २० आमदारांच्या मागे लागलात. आप विरोधात काहीही करू शकला नाहीत म्हणून अखेर आमच्या २० आमदारांना अपात्र ठरवलेत असा आरोप आता अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. नजफगड या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही टीका केली आहे.

शुक्रवारीच निवडणूक आयोगाने लाभाचे पद भुषवणाऱ्या २० आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधीची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. या शिफारसीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. रविवारी रामनाथ कोविंद यांनी या सगळ्या आमदारांना अपात्र ठरवले आहे. त्यानंतर काँग्रेसने आम आदमी पार्टीवर टीका केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घेऊन केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

असे असले तरीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला फक्त मीच भ्रष्टाचारी आहे असे वाटते असे म्हणत टीका केली आहे. तसेच इतर लोक काय धुतल्या तांदळाप्रमाणे आहेत का? असा प्रश्नही विचारला आहे.