X
X

‘भारताच्या लोकशाहीला मोदींकडून धोका’

इकॉनॉमिस्ट साप्ताहिकातील टीकालेखावरून जोरदार वादंग

इकॉनॉमिस्ट साप्ताहिकातील टीकालेखावरून जोरदार वादंग

नवी दिल्ली : जगभरातील घडामोडींवर तटस्थ आणि मुद्देसूद भाष्य करणाऱ्या लंडनच्या ‘द इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिकाच्या ताज्या अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला हिंदू राष्ट्र बनवत असून भारतीय लोकशाही धोक्यात आणत आहेत, अशी टीका करणारा लेख प्रसिद्ध झाला. त्यावर समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू झाली असून भाजपच्या समर्थकांनी या लेखांवर पक्षपाती आणि वसाहतवादी लिखाण अशी टीका केली आहे.

‘द इकॉनॉमिस्ट’च्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या मुद्रीत आवृत्तीत, ‘इनटॉलरंट इंडिया : हाऊ मोदी इज एंडडेन्जरिंग द वर्ल्डस बिग्गेस्ट डेमॉक्रॅसी’ (असहिष्णू भारत: जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी कशी धोक्यात आणत आहेत) या शीर्षकाची मुखपृष्ठकथा प्रसिद्ध झाली. या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर काटेरी कुंपणातून कमळ फुलल्याचे चित्र आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’मधील लेखात भारताच्या आजच्या आर्थिक परिस्थितीसंदर्भातही इशारा देण्यात आला आहे. रेल्वेची तिकीटे, खाद्यपदार्थ आणि मोबाईल शुल्कात वाढ झाल्याचा उल्लेखही लेखात आहे. मोदी सरकारला आर्थिक मंदी हाताळण्यात अपयश आल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा निष्कर्ष काढण्याबरोबरच आगामी अर्थसंकल्पात सरकार सावरण्यासाठी ठोस उपाययोजना करेल, असा अंदाजही द इकॉनॉमिस्टमधी लेखात व्यक्त केला आहे.  पंतप्रधान मोदी भारताला हिंदू राष्ट्र बनवत असून देशातील २० कोटी मुस्लीम भीतीच्या छायेखाली आहेत, असे लेखात म्हटले आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी ही अनेक दशकापासून सुरू असलेल्या एका चिथावणीसदृश प्रकल्पाच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. या प्रकल्पाची सुरुवात अयोध्येतील संघर्षांपासून झाली होती, अशी टिप्पणीही करण्यात आली आहे.  लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला मिळालेले अमृततुल्य यश कदाचित भारतासाठी राजकीय विष आहे, असे लेखात नमूद करण्यात आले आहे.

अंकात काय?

‘द इकॉनॉमिस्ट’च्या या अंकात मोदींच्या राजवटीवर टीका करणारे तीन लेख आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रश्नाची हाताळणी त्याचबरोबर आर्थिक सुधारणा राबवणे आणि आर्थिक मंदी हाताळण्यातील अकार्यक्षमतेवर या लेखांमध्ये टीका-टिप्पणी करण्यात आली आहे.

टीका काय?

: पंतप्रधान मोदी भारताला हिंदू राष्ट्र बनवत असून देशातील २० कोटी मुस्लीम भीतीच्या छायेखाली आहेत, असे एका लेखात आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी ही अनेक दशकांपासून सुरू असलेल्या एका चिथावणीसदृश प्रकल्पाच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. या प्रकल्पाची सुरुवात अयोध्येतील संघर्षांपासून झाली होती, अशी टिप्पणीही करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला मिळालेले अमृततुल्य यश हे कदाचित भारतासाठी राजकीय विष आहे. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांना तिलांजली देऊन मोदी राबवत असलेल्या योजनांमुळे अनेक वर्षांपासून भारतात नांदणाऱ्या लोकशाहीस धोका निर्माण झाला आहे, असे लेखात नमूद करण्यात आले आहे.

मोदींभोवतीच्या बदलत गेलेल्या मुखपृष्ठकथा

‘द इकॉनॉमिस्ट’ या लंडनस्थित साप्ताहिकाने नरेंद्र मोदी यांचे कधीही समर्थन केले नव्हते, परंतु ते कदाचित भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काही मोठय़ा गोष्टी करू शकतात, याबाबत ते सहमत होते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून अनेक मुखपृष्ठकथा प्रसिद्ध केल्या. पहिल्या अंकात या साप्ताहिकाने मोदींना ‘स्ट्रॉगमॅन’ असे संबोधले होते. दुसऱ्या अंकातील मुखपृष्ठकथेचे शीर्षक ‘कॅन एनीवन स्टॉप नरेंद्र मोदी?’ असे होते. तिसऱ्या अंकातील मुख्य लेखाचा मथळा ‘इंडियाज चान्स टू फ्लाय’, असा होता. मोदीज इंडिया- द इलुजन ऑफ रिफॉर्म, अशा शब्दांत मोदींच्या धोरणांवर टीका करण्यात आली होती.

22
Just Now!
X