पाकिस्तानचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत. लाहोर विमानतळावर नरेंद्र मोदी यांना सोडण्यासाठी स्वतः नवाज शरीफ उपस्थित राहिले होते.
अफगाणिस्तान संसदेच्या उदघाटनचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरला गेले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने पाकिस्तानच्या धावत्या भेटीवर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाहोर विमानतळावर आगमन झाल्यानंतर शरीफ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विमानतळावर मोदी आणि शरीफ यांची गळाभेटदेखील झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवाझ शरीफ यांच्या लाहोरमधील निवासस्थानी पोहोचले. शरीफ यांच्या नातीचा आज विवाह असल्याने त्यांचे निवासस्थान रोषणाईने सजले होते. यावेळी मोदी यांच्यासाठी खास काश्मिरी चहाचा मेन्यू ठेवण्यात आला होता. तेथे या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा रंगली. या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोर विमानतळाच्या दिशेने भारतात येण्यास निघाले.
फोटो गॅलरीः भारताचे पंतप्रधान पाकिस्तान भेटीवर
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यामुळे पाकिस्तानातील लोकशाही अधिक बळकट होईल, आणि दोन्ही देशांत पुढील चर्चेसाठी अधिक चांगले वातावरण तयार होईल, असे सुरक्षा तज्ज्ञ कमर आगा यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, मोदींच्या पाक भेटीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले असून युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या पाक भेटीबाबत नाराजी व्यक्त करत दिल्लीमध्ये निदर्शने केली. पाकिस्तानात उतरून पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणार असल्याची माहिती खुद्द पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली होती. सुरक्षेच्या कारणास्तव लाहोर विमानतळावर इतर विमानांचे लॅण्डींग थांबविण्यात आले होते.
मोदींच्या या अचानक पाकिस्तान भेटीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवावेच लागतात, असे सांगून मोदींच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळेच शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदींनी या अचानक पाकिस्तान दौऱयाचे प्रयोजन केले.  शरीफ यांच्याशी भेटीबाबत फोनवर बोलणे झाले असल्याचीही माहिती मोदींनी ट्विटद्वारे दिली.
दरम्यान, पंतप्रधान विराजमान झाल्यानंतर मोदी या निमित्ताने पहिल्यांदाच पाकिस्तानला भेट देणार आहेत. द्वीपक्षीय संबंधांना बळकटी येण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरू शकते. याआधी पॅरिसमध्येही मोदी आणि शरीफ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली होती.

Looking forward to meeting PM Nawaz Sharif in Lahore today afternoon, where I will drop by on my way back to Delhi. — Narendra Modi (@narendramodi) December 25, 2015