अमेरिकेच्या दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला ठणकावले. मोदींनी पहिल्यांदाच अमेरिकी संसदेत दोन्ही सभागृहाला संबोधित केले. दहशतवाद, रोजगार, व्यापार, योगा, लोकशाही अशा विविध मुद्यांना यावेळी मोदींनी स्पर्श केला. दहशतवादाचा किल्ला भारताच्या शेजारीच असल्याचा उल्लेख करत मोदींनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. दहशतवाद आणि सायबर गुन्हेगारी या दोन मोठ्या समस्या सध्या जगासमोर असून, दहशतवाद्यांना पोसणाऱयांविरोधात कडक पावले उचलण्याची वेळ आल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे, त्यांनी सोबत यावे आपण एकत्रितपणे दहशतवादाचा बिमोड करू, असे आवाहन मोदींनी केले. भारत सर्व आव्हानांसाठी सज्ज असून, भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा अभिमान मोदींनी व्यक्त केला. मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळी अमेरिकेने भारताला केलेल्या मदतीचाही मोदींनी आपल्या भाषणामध्ये आवर्जुन उल्लेख केला. अमेरिकेने भारताला अडचणीच्या वेळी सहकार्य केले असून दोन्ही देश एकमेकांचे नैसर्गिक मित्र असल्याचे मोदी म्हणाले. जगातल्या कोणत्याही इतर देशापेक्षा भारताचा अमेरिकेशी जास्त व्यापार आहे. यासोबतच अमेरिकेत आज अनेक भारतीय डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ सेवेत आहेत, असेही मोदी म्हणाले. योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही देशात अनेक उपक्रम सुरू केले. भारतीय योगाचा अमेरिकेवरही मोठा प्रभाव आहे. ३ कोटी अमेरिकन नागरिकांना योगाचा फायदा झाल्याचाही दावा मोदींनी यावेळी केला.

अमेरिकेतील लोकशाही जगातील इतर देशांच्या लोकशाहीला प्रेरणा देते. अमेरिकेप्रमाणे भारतातही व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व आहे. जगातील सर्वात मोठी भारताची लोकशाही ही व्यक्तीस्वातंत्र्याच्या मूल्याला महत्त्व देते. दोन्ही देशांच्या सैनिकांनी मानवतेसाठी बलिदान दिल्याचे मोदी म्हणाले. २०२२ सालापर्यंत भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे स्वप्न असून, त्यादृष्टीने माझ्या सरकारने प्रयत्न सुरू आहेत, असेही मोदी पुढे म्हणाले.

मोदींच्या भाषणातील मुद्दे-

  • दहशतवाद्यांना पोसणाऱयांविरोधात कडक कारवाई करण्याची वेळ आली.
  • ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे, त्यांनी सोबत यावे आपण एकत्रितपणे दहशतवाद मोडून काढू
  • दहशतवादाचा किल्ला भारताच्या शेजारी आहे, नाव न घेता मोदींचा पाकिस्तानवर निशाणा
  • दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही.
  • भारतीय उपखंडात सर्व आव्हानांसाठी भारत सज्ज.
  • २६/११ हल्ल्यावेळी अमेरिकेने केलेली मदत भारत कधीच विसरू शकत नाही
  • भारतीय योगाचा अमेरिकेवर मोठा प्रभाव आहे, ३ कोटी अमेरिकन नागरिकांना योगाचा फायदा
  • जगातल्या कोणत्याही इतर देशापेक्षा भारताचा अमेरिकेशी व्यापर जास्त
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतात रोजगार निर्मिती झाली
  • अमेरिकेने अडचणीच्या वेळी भारताला वेळोवेळी सहकार्य केले.
  • दोन्ही देशांच्या सैनिकांचे मानवतेसाठी बलिदान.
  • अमेरिकेच्या संसदेतील भाषणात मोदींकडून अटल बिहारी वाजपेयींच्या वक्तव्यांचा उल्लेख.
  • अमेरिकेप्रमाणे भारतातही व्यक्तीस्वातंत्र्याचा महत्त्व.
  • माझ्या सरकारसाठी संविधान हा महान ग्रंथ आहे
  • विविधतेत एकता हे दोन्ही देशांचे समान सुत्र
  • अमेरिकेने मला भाषणाला निमंत्रित करून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा सन्मान केला
  • अमेरिकेच्या लोकशाहीच्या या मंदिराने इतर अनेक देशातील लोकशाही बळकट केली.
  • अमेरिकेतील लोकशाही जगातील लोकशाहीला प्रेरणा देते.