‘व्हायब्रंट गुजरात’ या जागतिक गुंतवणूक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

रोजगारनिर्मितीसाठी गुंतवणुकीत भरघोस वाढ आवश्यक असून गेल्या चार वर्षांच्या आमच्या कारकीर्दीत परकीय गुंतवणूक सर्वाधिक झाली आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘व्हायब्रंट गुजरात’ या जागतिक परिषदेत केले.

जगभरातून आलेल्या राजकीय आणि अर्थ क्षेत्रातील नेते आणि धुरीणांसमोर ते म्हणाले की, ‘‘गेल्या चार वर्षांत २६३ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक देशात झाली. ही गेल्या १८ वर्षांच्या कालावधीतील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ४५ टक्के गुंतवणूक ठरली आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. परकीय गुंतवणुकीचे ९० टक्के प्रस्ताव हे नियमनरहित थेट मार्गाने मंजूर झाल्याने परकीय गुंतवणूकदारांचा भारताकडील ओघ वाढत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गेल्या चार वर्षांत आर्थिक विकासदर ७.३ टक्क्यांवर राहिला आहे. त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनाचे प्रमाणही १९९१ पासून सर्वाधिक आहे, असेही ते म्हणाले. मोदी म्हणाले की, ‘‘भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्नही अतिशय महत्त्वाचा आहे. या देशात नफा कमावण्यासाठी येणाऱ्या गुंतवणूकदारांना म्हणूनच आम्ही सांगतो की, तुम्ही इथे रोजगार संधी वाढतील, लोकांचे जीवन अधिक सुखकर होईल, याकडेही लक्ष द्या.’’

माझे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत निश्चित दिशा, कार्यनिष्ठा आणि तडफ यांचा प्रत्यय सरकारी पातळीवर येत आहे.

रस्ते, बंदरे, रेल्वे, विमानतळ, दळणवळण, डिजिटल नेटवर्क आणि ऊर्जा यांसारख्या पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर आमचा भर आहे. त्यातून ‘नवभारत’ आकाराला येईल आणि तो आधुनिकतेबरोबरच सहृदयता जपणाराही असेल, असे आमचे स्वप्न आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

नवी आकांक्षा

जगातील ५० गुंतवणूकसुलभ देशांच्या पुढील वर्षांच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट व्हावे, यासाठी सर्वतोपरी परिश्रम करण्याचे आवाहन मी सर्व संबंधित विभागांना केले आहे, असेही मोदी यांनी सांगितले. सध्या भारत या क्रमवारीत ७७व्या स्थानी आहे.

नवा मंत्र..

‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्स्फॉर्म आणि अधिक परफॉर्म’ असा मंत्र देशाच्या प्रशासनाला आपण दिला आहे. त्यानुसार आर्थिक सुधारणा, त्यानुसार ठोस कारभार आणि परिवर्तनाची प्रक्रिया पार पडत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.