पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षात ८४ देशांचा दौरा केला असून यावेळी चार्टर्ड विमाने, विमानांची देखभाल आणि हॉटलाइन सुविधांसाठी एकूण १४८४ कोटींचा खर्च केला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी तीन भागांत विभागणी करत एकूण किती खर्च आला याची माहिती दिली.

आकडेवारीनुसार, १५ जून २०१४ ते १० जून २०१८ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमान देखभालीसाठी एकूण १०८८.४२ कोटी रुपये आणि चार्टर्ड विमानांवर ३८७.२६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. हॉटलाइनसाठी एकूण ९.१२ कोटी रुपये खर्च आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधानपद हाती घेतल्यापासून एकूण ८४ देशांचा दौरा केला आहे.

व्ही के सिंह यांनी दिलेल्या माहितीत नरेंद्र मोदींच्या २०१७-१८ आणि २०१८-१९ मधील परदेश दौऱ्यातील हॉटलाइन सुविधांच्या खर्चाचा समावेश करण्यात आलेला नाही. तसंच २०१८-१९ मधील चार्टर्ड विमानाच्या खर्चाचाही उल्लेख नाहीये. व्ही के सिंह यांनी सांगितल्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१५-१६ मध्ये सर्वात जास्त २४ देशांचा दौरा केला. तर २०१७-१८ मध्ये १९ आणि २०१६-१७ मध्ये १८ देशांचा दौरा केला. २०१४-१५ मध्ये मोदींनी १३ देशांचा दौरा केला, ज्यामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून जून २०१४ मध्ये त्यांनी भूटानला भेट दिली. २०१८ मध्ये मोदींनी १० देशांचा दौरा केला ज्यामध्ये शेवटचा दौरा चीनचा होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यातून व्यापार, परदेशी गुंतवणूक सहित महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये हातमिळवणी करण्याचा प्रयत्न असल्याचं व्ही के सिंह बोलले आहेत.