19 December 2018

News Flash

दक्षिण चीन समुद्र प्रश्नावर भारताचे ‘आसिआन’ देशांना सहकार्य

मोदी यांची मनिला येथील शिखर परिषदेत ग्वाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मोदी यांची मनिला येथील शिखर परिषदेत ग्वाही

दक्षिण चीन समुद्रात आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित संरक्षण संरचना उभी करण्यासाठी भारत ‘आसिआन’ संघटनेच्या सदस्य देशांना मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे मंगळवारी झालेल्या आसिआन-भारत शिखर परिषदेला संबोधित करताना मोदींनी ही ग्वाही दिली. तसेच दहशतवाद व कट्टरतावाद ही सध्या या प्रदेशासमोरील सर्वात मोठी आव्हाने असून त्यांचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरजही मोदींनी या वेळी व्यक्त केली.

मनिला येथे १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ‘आसिआन’ आणि ‘ईस्ट एशिया’ या शिखर परिषदा पार पडल्या. ‘आसिआन’ परिषदेत व्यापार व गुंतवणूक या विषयांना प्राधान्य होते, तर ईस्ट एशिया समिटमध्ये सागरी सुरक्षा, दहशतवाद, शस्त्रास्त्र प्रसारबंदी आणि स्थलांतर आदी विषयही चर्चेला आले. भारताचा भर या प्रदेशातील व्यापारी व सामरिक संबंध सुधारण्यावर होता. दक्षिण चीन समुद्रातील चीनची अरेरावी आणि उत्तर कोरियाची अण्वस्त्रलालसा यांना पायबंद घालण्याबाबतही परिषदेत विचार झाला.

गेल्या काही वर्षांपासून चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर अधिकार सांगत आहे. या प्रदेशात चीन समुद्रात भराव घालून कृत्रिम बेटे तयार करत आहे. तसेच अन्य देशांचे या प्रदेशातील दावे फेटाळून लावत मुक्त नौवहनास आडकाठी करत आहे. या प्रश्नावर मोदींनी चीनचा थेट उल्लेख टाळत भाष्य केले. दक्षिण चीन समुद्रात आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित संरक्षण संरचना उभी करण्यासाठी भारत ‘आसिआन’ संघटनेच्या सदस्य देशांना मदत करेल, असे मोदी म्हणाले. दक्षिण चीन समुद्रातील वाद मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा आणि १९८२चा संयुक्त राष्ट्रांचा सागरी सीमांबाबतचा करार यांचा आधार घेतला जावा, अशी भूमिका भारताने कायम घेतली आहे. तिचा पुनरुच्चार करत मोदींनी ‘आसिआन’ देशांना सहकार्याचे वचन दिले. तसेच दहशतवाद ही सध्याची गंभीर समस्या आहे. भारत आजवर त्याचा एकटय़ाने सामना करत आहे. दहशतवादाचा कायमचा बीमोड करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे या वेळी मोदींनी सांगितले.

‘रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसीईपी)च्या व्यापार आणि गुंतवणूकविषयक चर्चेतही मोदी सहभागी झाले. ‘आरसीईपी’मध्ये ‘आसिआन’च्या १० सदस्यांसह भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सहा देश सहभागी आहेत. पुढील वर्षांत प्रजासत्ताक दिनासाठी (२६ जानेवारी २०१८) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण मोदींनी आसिआनच्या नेत्यांना दिले. भारत २५ जानेवारी २०१८ रोजी ‘आसिआन’बरोबर विशेष परिषद आयोजित करत असल्याचेही मोदींनी या वेळी सांगितले.

‘आसिआन’चे भारतासाठी महत्त्व..

‘आसिआन’ (असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्स) या संघटनेत थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, म्यानमार, कम्बोडिया, लाओस आणि ब्रुनेई हे आग्नेय आशियातील १० देश आहेत. तर ईस्ट एशिया समिटमध्ये या १० देशांव्यतिरिक्त भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि रशिया यांचा समावेश आहे. ‘आसिआन’ सदस्य देश आणि भारतात मिळून जगाची एकचतुर्थाश लोकसंख्या म्हणजे १.८५ अब्ज नागरिक राहतात. त्यांचे एकत्रित सकल राष्ट्रीय उत्पन्न ३.८ ट्रिलियन डॉलर इतके आहे. गेल्या १७ वर्षांत ‘आसिआन’ देशांतून भारतात ७० अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक झाली आहे. हे प्रमाण भारतातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीच्या १७ टक्के इतके आहे. याच काळात भारताने ‘आसिआन’ देशांत ४० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

First Published on November 15, 2017 1:38 am

Web Title: narendra modi visit to philippines 2