राज्यसभेतील गोंधळाबाबत सर्वत्र टीकेचे सूर उमटत असताना आणि संसदेचे हिवाळी अधिवेशन शेवटाला येऊन ठेपले असताना, या वरिष्ठ सभागृहाचे सभापती असलेले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी उनाड सदस्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जादा अधिकारांची मागणी केली आहे.
सभागृहाच्या नियम समितीने बैठक बोलवावी आणि ज्याप्रमाणे लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याला कामकाजात अडथळा आणणाऱ्या सदस्यांना बाहेर काढण्याची मुभा देणारे अधिकार आहेत, त्याचप्रमाणे नवे नियम तयार करावेत अशी सूचना अन्सारी यांनी गुरुवारी केली.
नव्या नियमांबाबत विचारविनिमय करण्यासाठी उपराष्ट्रपती पुढील आठवडय़ात राज्यसभेच्या ‘जनरल पर्पजेस कमिटी’ (जीपीसी)ची बैठक बोलावू शकतात, असे त्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. जीपीसीला सर्व राजकीय पक्षांचे नेते हजर असतात आणि नियम समितीने हा मुद्दा विचारात घेण्यापूर्वी उपराष्ट्रपती त्यांच्याशी भेटू इच्छितात असेही सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्सारी यांची भेट घेतल्याच्या दिवशीच अन्सारी यांनी ही सूचना केली आहे. बुधवारी उपसभापती पी.जे. कुरियन व तृणमूल काँग्रेसचेसुखेंदू शेखर रॉय यांची चकमक उडाली व त्यात रॉय यांनी कुरियन यांच्यावर ‘नियमानुसार नव्हे, तर आश्वासनांवर’ सभागृहाचे कामकाज चालवत असल्याचा आरोप केला. त्यानंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रॉय यांनी सभागृहाचे कामकाज चालवण्यात पीठासीन अधिकाऱ्यांच्या अक्षमतेबाबत, तसेच एक पक्ष संपूर्ण सभागृहाला वेठीला धरत असल्याबद्दल निराशा व्यक्त केली.

‘सहकाऱ्यांनो! हताश होऊ नका’
विरोधकांची मोहिम खोटेपणावर आधारलेली असून त्यांच्या आक्रमणाने हताश होण्याचे कारण नाही. सरकारच्या कामगिरीबद्दल चांगले वाटू द्या, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना विरोधकांशी लढण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत मोदी यांनी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्र्यांना केले.