करोनाने देशात थैमान घातले. शहरानंतर करोनाने ग्रामीण भागात देखील पाय पसरायला सुरवात केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. बैठकीत जिल्ह्यांमधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच लसीची प्रक्रिया वाढविण्याबाबत चर्चा होईल.

२० मे रोजी महाराष्ट्रासह १० राज्यांच्या ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. पहिल्या फेरीत २० मे रोजी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पंडिचेरी, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, केरळ आणि हरियाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असेल. त्यानंतर नरेंद्र मोदी उर्वरित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे ४१२० जण मृत्युमुखी पडल्यामुळे देशातील करोनामृत्यूंचा आकडा २,५८,३१७ वर पोहोचला आहे. याच कालावधीत आणखी ३,६२,७२७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलं आहे. भारतीयांसाठी चिंताजनक बाब म्हणजे मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्याने करोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा १० हजारांनी अधिक आहे.

भारतामधील एकूण रुग्णसंख्या दोन कोटी ३७ लाखांहून अधिक झाली आहे. तर करोनावर मात करणाऱ्यांची संख्या एक कोटी ९७ लाख ३४ हजार ८२३ इतकी असल्याचं आरोग्यमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशातील सक्रीय करोना रुग्णांची संख्या ३७ लाख १० हजार ५२५ इतकी आहे. देशामध्ये एकूण १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ जणांचं लसीकरण करण्यात आल्याचंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.