News Flash

दावोस अर्थ परिषदेत पंतप्रधान म्हणाले..

परस्पर सहकार्यातून जगाचे भविष्य असे यंदाच्या परिषदेचे सूत्र आहे.

नरेन्द्र मोदी
  • १९९७ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा दावोसला आले होते तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ४०० अब्ज डॉलर्स इतकी होती; आता २०१८ मध्ये देशाची अर्थव्यवस्था सहा पटींनी विस्तारलेली आहे. त्या वेळी ओसामा बिन लादेनची फारशी माहिती नव्हती. गुगल नव्हते. इंटरनेटवर कोणी अ‍ॅमेझॉन शोधण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला नदी वा जंगलाची माहिती मिळाली असती. ट्वीट करणे हे निव्वळ पक्ष्यांचे मानले गेले असते. आता काळ खूप बदलला आहे.
  • आजच्या काळात डाटा (माहितीचा प्रवाह) हीच संपत्ती असून ज्याकडे ती असेल तोच भविष्यात जगाचे नेतृत्व करील. माहितीचे आदानप्रदान नव्या संधी आणि आव्हानही निर्माण करतात. तंत्रज्ञान लोकांचे विचार, कार्यपद्धती, राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय गटतटांवर परिणामकारक ठरत आहेत. तंत्रज्ञानाच्या आधारे एखाद्या माहितीची मोडतोड केली जाते. त्यात अनावश्यक भरही टाकली जाते. तंत्रज्ञानाचा वापर वेडावाकडा केला जातो. सोशल मीडिया हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
  • परस्पर सहकार्यातून जगाचे भविष्य असे यंदाच्या परिषदेचे सूत्र आहे. आजच्या मतभेदांच्या, विभक्त जगासाठी भारतीय ‘वसुधैव कुटुंबकम’ (जग सारे कुटुंब) हे तत्त्वज्ञान महत्त्वाचे ठरू लागले आहे. भारत नेहमीच जगाला आपले कुटुंब मानत आला आहे. मानवतेचे पूल बांधणे ही काळाची गरज आहे. जगाची शांतता भंग करणारे स्फोटक घटक सध्या जगात कार्यरत आहेत ते विकासाला बाधा आणत असून आपण सारे एकत्र येऊन त्यांचे मनसुबे मोडून काढू.
  • महात्मा गांधींनी विश्वस्ताची संकल्पना मांडली होती. प्रत्येकासाठी त्याची गरज महत्त्वाची असते, पण त्याची हाव नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करू शकते. त्यामुळेच आपल्याला प्रगती करायची की अधोगती हे ठरवले पाहिजे.
  • भारतात विविध धर्म, संस्कृती, भाषा, राहणी, खानपान पाहायला मिळते. त्यामुळेच भारतातील लोकशाही निव्वळ राजकीय व्यवस्था नव्हे, ती जगण्याची पद्धत आहे. भारतातील लोकशाही, लोकसंख्या आणि त्यातील गतिमानता देशाच्या विकासाला आणि भविष्याला दिशा देत आहे.
  • तीस वर्षांनंतर सन २०१४ मध्ये ६०० कोटी भारतीयांनी राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत देत केंद्रात सत्ता स्थापण्याची संधी दिली. हे विकासासाठी मिळालेले जनमत असल्याचे आम्ही मानतो. ‘सबका साथ, सबका विकास’ हाच आमचा नारा आहे. सर्वसमावेशकता हाच सरकारच्या धोरणांचा केंद्रबिंदू आहे.
  • महायुद्धात जग होरपळून निघत होते तेव्हा भारताने १.५ लाख शांतिसैनिक पाठवले होते. या शांतिसैनिकांना कुठल्याही भौगोलिक महत्त्वाकांक्षा नव्हत्या. याच तत्त्वांच्या आधारे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत नेहमीच भारत सहभागी होत आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:26 am

Web Title: narendra modi world economic forum 2018 at davos
Next Stories
1 परिस्थिती चिघळल्यास दाद मागण्याची परवानगी!
2 लग्न करण्यासाठी लष्करी जवान दोनवेळा तळ सोडून पळाला
3 Loksatta Poll – शिवसेना Vs भाजपा, कोण मारेल बाजी? द्या तुमचं मत
Just Now!
X