पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ब्लॉग लिहून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. या ब्लॉगमधून त्यांनी काँग्रेसवर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप केला आहे. देशातील घटनात्मक संस्था या घराणेशाहीच्या राजकारणाच्या बळी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘संस्थात्मक आदर आणि संस्थात्मक द्वेष – दोन विभिन्न दृष्टीकोन’ या मथळ्याखाली मोदींनी ब्लॉग लिहीला आहे. यात मोदी म्हणतात, २०१४च्या उन्हाळ्यात लोकांनी घराणेशाहीला नाकारून लोकशाहीला निवडलं होतं. विनाशाला नाही तर विकासाला निवडलं होतं, शिथिलतेला नाही तर सुरक्षेला निवडलं होतं, विरोधाला नाही तर संधीला प्राधान्य दिलं होतं, वोट बँकेच्या राजकारणाला बाजूला सारुन विकासाच्या राजकारणाला निवडलं होतं.

मोदी म्हणतात, माध्यमांपासून संसदेपर्यंत, जवानांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत, संविधानापासून कोर्टापर्यंत काहीही काँग्रेसच्या राजकारणापासून सुटलेले नाही, या घटनात्मक संस्थांचा अपमान करणे ही काँग्रेसची पद्धत आहे. काँग्रेसला वाटतं की सर्व चुकीचे आहेत आणि फक्त तेच बरोबर आहेत. म्हणजेच काँग्रेस जे सांगेल तेच खरं, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे.

दरम्यान, जनतेला आवाहन करताना मोदी म्हणतात, आपण जेव्हा मतदान करण्यासाठी जालं तेव्हा एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की, कशा प्रकारे एका कुटुंबाच्या सत्तेच्या लालसेपोटी देशाने मोठी किंमत चुकवली आहे. काँग्रेसने देशाला नेहमीच संकटात टाकल आहे, यंदाही ते असंच करतील. त्यामुळे लक्षात ठेवा जर आपल्याला आपले स्वातंत्र्य राखायचे असेल तर आपल्याला प्रत्येक वेळी सतर्क रहायला हवे.