गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘गुजरात मॉडेल’ला वस्तुस्थितीचा आधार नसल्याचा आरोप करून राज्याच्या विकासासंबंधी मोदी यांचे दावे फोल ठरविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मोदी हे ‘झीरोही नाहीत आणि हीरोही नाहीत,’ अशी टिप्पणीही काँग्रेसने केली.
केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी गुरुवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी यांच्या कामगिरीचा समाचार घेणारा ३२ पानी दस्तावेज सादर केला. ‘मोदी यांचे राज्य देशातील सर्वात जास्त कर्जदार राज्य आहे,’ असे सिब्बल म्हणाले. मोदी हे हीरोही नाहीत आणि झीरोही नाहीत, त्यांची जागा याच्या मध्ये कोठेतरी आहे. भारतात प्रत्येकास ते खाली खेचण्याचा प्रयत्न करतात आणि जे काही केले असेल, त्या प्रत्येक बाबीचे श्रेय ते स्वत:कडेच एखाद्या मसिहाच्या थाटात घेतात, अशी कोपरखळी सिब्बल यांनी मारली.
खरे म्हणजे देशात दिल्लीसह अनेक राज्ये आज गुजरातच्या पुढे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मोदी इतिहास बदलतात, आकडेवारी बदलतात. परंतु गुजरातमध्ये जसे चांगले आहे, तसेच वाईटही आहे. प्रत्येक राज्यात जे असते, तीच गुजरातची परिस्थिती आहे, असे मत सिब्बल यांनी मांडले. दिल्ली हे राज्यही गुजरातपेक्षा आघाडीवर आहे, असा दावा करून दिल्लीचा विकासदर ११.३९ टक्के तर गुजरातचा १०.१३ टक्के असल्याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक ५० अब्ज अमेरिकी डॉलर्स तर गुजरातमधील परकीय गुंतवणूक केवळ एक अब्ज डॉलर्स होती. सन २०१२-१३ मध्ये दिल्लीची वित्तीय तूट २६ अब्ज रु. तर गुजरातची वित्तीय तूट १७८.३ अब्ज रुपयांची होती आणि या मुद्दय़ास रिझव्र्ह बँकेच्या आकडेवारीचा आधार आहे, असे सिब्बल म्हणाले. मोदी मुख्यमंत्री होण्यापूर्वीच राज्यात मोठे प्रकल्प आले होते तसेच गुजरातचा विकासही झालेला होता, असाही दावा सिब्बल यांनी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 12:16 pm