लोकांच्या बोटावर शाई लावण्याऐवजी जनतेच्या तोंडाला काळे फासले असते तर बरे झाले असते अशी उपरोधिक टीका समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली आहे. नोटाबंदीचा तुघलकी निर्णय मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

गुरुवारी राज्यसभेत नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा झाली. या चर्चेत नरेश अग्रवाल यांनी मोदी सरकारला चिमटे काढले. अग्रवाल यांना आठ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. पण अग्रवाल यांनी त्यापेक्षा जास्त वेळ घेत मोदी सरकारवर टीका केली.  ‘मी देशात अनेक पंतप्रधान बघितले. इंदिरा गांधी यांनी आणिबाणीच्यावेळी अहवाल मागवले होते. त्यामध्ये जनता आणिबाणीच्या बाजूने असल्याचा दावा करण्यात आला. पण १९७७ मधील निवडणुकीत वेगळे चित्र होते अशी आठवण अग्रवाल यांनी करुन दिली. देशात आर्थिक आणिबाणीच लागू झाली आहे अशी टीका त्यांनी केली. विदेशात किती काळा पैसा आहे आणि भारतात किती जणांकडे काळा पैसा आहे हे पंतप्रधानांनी जाहीर करावे. जर ६ टक्के लोकांकडे काळा पैसा असेल तर मग उर्वरित ९४ टक्के लोकांना त्रास का द्यायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महागाई सगळीकडेच आहे. परदेशात कधी त्यांचे चलन रद्द झाले नाही. काळा पैसा असलेले किती उद्योजक बँकेच्या रांगेत उभे होते अशा असंख्य प्रश्नांची सरबत्तीच अग्रवाल यांनी सरकारवर केली. नोटाबंदीचा निर्णय देशासाठी घातक आहे. हा निर्णय देशहितासाठी नव्हे तर उत्तरप्रदेशमधील निवडणुकाबघून घेण्यात आला असा दावाही त्यांनी केला. अग्रवाल पुढे म्हणाले, अर्थ खात्याचे मुख्य सचिव टीव्हीवर निर्णय जाहीर करतात. पण बँकेत गेल्यावर अधिकारी असा कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही असे सांगतात.

देशातील काळा पैशासोबतच विदेशातील काळा पैसा भारतात कधी आणणार. निवडणुकीत तुम्ही विदेशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भाजप हा उद्योगपतींचा पक्ष आहे. पण मोदी आल्यावर हा पक्ष गरीबांचा बनला आहे असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपने बँकांच्या राष्ट्रीयकरण करण्यास विरोध दर्शवला होता. हाच पक्ष उद्योगपतींचे रक्षण करतानाही आम्ही बघितले आहे असे त्यांनी नमूद केले. स्टेट बँक ऑफ इंडियाने सात हजार कोटींचे कर्ज बुडीत ठरवले आहे. यामध्ये विजय मल्ल्याच्या कर्जाचा समावेश आहे. गरीबांकडून कर स्वरुपात जमा केलेले २० हजार कोटी रुपये तुम्ही बँकांना देता, पण बँक धनाढ्यांचे सात हजार कोटींचे कर्ज बुडीत ठरवते असे विधानही त्यांनी केले. अहंकार हा अंधारात बुडवतो हे विसरु नका असे त्यांनी मोदी सरकारला उद्देशून सांगितले.

मोदीजी तुम्ही भावूक होऊन भाषण करतात तेव्हा मला खंत वाटते. तुमच्या जीवाला धोका आहे असे तुम्ही सांगता. पण तुम्ही उत्तरप्रदेशमध्ये या तुम्हाला कोणीही हात लावणार नाही असे अग्रवाल यांनी सांगितले. अग्रवाल यांच्या विधानानंतर पंतप्रधानांनाही हसू आवरता आले नाही. मोदींना जर देशातच धोका असेल, तर मग पाकिस्तानपासून आमचे रक्षण कोण करणार असा उलट सवालच त्यांनी विचारला.