जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यास मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. गोयल यांनी त्यांच्याविरुद्ध बजावण्यात आलेल्या लुक-आऊट नोटिशीला आव्हान दिले असून न्यायालयाने त्याबाबत केंद्र सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

नरेश गोयल यांना या घडीला परदेशात जाण्याची परवानगी देता येणार नाही, त्यांना आता परदेशात जावयाचे असल्यास त्यांना १८ हजार कोटी रुपयांची हमी द्यावी लागेल, असे न्या. सुरेश कैत यांनी स्पष्ट केले.

दुबईला जाणाऱ्या विमानातून २५ मे रोजी आपल्याला उतरविण्यात आले तेव्हा आपल्याविरुद्ध ईसीआयआर अथवा एफआयआर नोंदविण्यात आलेला नव्हता, असे सांगून गोयल यांनी त्यांच्याविरुद्ध बजावण्यात आलेल्या लुक-आऊट नोटिशीला आव्हान दिले आहे.

विमानातून आपल्याला पत्नीसह उतरविण्यात आले तेव्हा आपल्याला लुक-आऊट नोटिशीबाबत समजले, असे गोयल यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

ज्या दिवशी गोयल दाम्पत्याला विमानातून उतरविण्यात आले तेव्हा ते चौकशी टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबतचा कोणताही पुरावा देण्यात आला नाही, त्याचप्रमाणे ते अनिवासी भारतीय असल्याने काही कालावधीसाठी त्यांना परदेशात जाणे क्रमप्राप्त आहे, असा युक्तिवाद गोयल यांचे वकील मणिंदरसिंग यांनी केला. जेट एअरवेज सध्या आर्थिक विवंचनेत असल्याने त्या कंपनीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी गोयल यांना दुबई आणि लंडनला जावयाचे होते, असेही मणिंदरसिंग म्हणाले.