आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल जेटच्या संचालक मंडळावरुन पायउतार झाले आहेत. त्यांनी जेटच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. २५ वर्षांपूर्वी नरेश गोयल यांनी पत्नी अनितासह मिळून जेट एअरवेजची स्थापना केली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

चेअरमनपदावरुन पायउतार होण्यास व कंपनीतील ५१ टक्के हिस्सा कमी करण्यास नरेश गोयल तयार असल्याची माध्यमांमध्ये चर्चा होती. कर्ज थकितापोटी कर्मचारी, वैमानिकांचे वेतन वेळेवर देऊ शकत नसलेल्या जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याची सूचना स्टेट बँकेने प्रवर्तक नरेश गोयल तसेच त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना केली होती.

कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे जेटचा नियमित उड्डाणे चालू ठेवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. वैमानिक, पुरवठादार, बँका आणि कर्मचाऱ्यांचे पगार, हप्ते वेळेवर देणे जेटला शक्य होत नाहीय. जेटची ४० विमाने जमिनीवरच उभी आहेत. जेट एअरवेजने याआधी सुद्धा गंभीर आर्थिक संकटाचा सामना केला आहे. २०१३ मध्ये अबूधाबीच्या इतिहाद एअरवेजने जेटमध्ये गुंतवणूक करुन २४ टक्के हिस्सा विकत घेतला.

जेटला या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज मिळू शकते. जेट एअरवेजवर सध्या २६ बँकांचे आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.