पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वयाची ६९ वर्षे पूर्ण करीत असताना गुजरातला भेट देऊन सरदार सरोवर धरणाजवळ नर्मदेची आरती केली. मंगळवारी त्यांचे केवडिया येथे आगमन झाले.

मुख्यमंत्री विजय रूपांनी त्यांच्या समवेत होते. मोदी यांनी राज्य सरकारच्या नमामी देवी नर्मदे महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानिमित्ताने नर्मदा पूजन केले. सरदार सरोवर धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले असून त्यानिमित्त हा महोत्सव आयोजित केला आहे. मोदी यांनी केवडिया येथील फुलपाखरू उद्यानास भेट दिली. त्यांनी भगव्या-केशरी रंगाच्या टायगर फुलपाखरास राज्याचे फुलपाखरू जाहीर केले.

मोदी यांनी एकता पुतळ्यास भेट देऊन मंगळवारच्या कार्यक्रमांची सुरुवात केली. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरला मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकता पुतळ्याचे अनावरण केले होते. मोदी यांनी मंगळवारी हेलिकॉप्टरमधून एकता पुतळ्याची घेतलेली छबी ट्विटवर प्रसारित केली. मोदी यांचे मंगळवारी सकाळी केवडिया येथे आगमन झाले.  यावेळी सरदार सरोवर धरण १३८.६८ मीटर इतक्या पूर्ण क्षमतेने भरले असून नमामी नर्मदा महोत्सवात मोदी यांनी नर्मदेची आरती केली. धरणाची उंची २०१७ मध्ये वाढवण्यात आल्यानंतर प्रथमच पाणी १३८.६८ मीटर इतक्या सर्वोच्च पातळीला पोहोचले आहे. मोदी व  रूपानी यांनी धरणाच्या ठिकाणी पूजा करून गुजरातची जीवनदायिनी असलेल्या नर्मदेचे आशीर्वाद घेतले. एकता पुतळा व धरण परिसरातील विकास कामांची त्यांनी पाहणी केली.

रिव्हर राफ्टिंग, जंगल सफारी पार्क, बटरफ्लाय पार्क, एकता नर्सरी असे अनेक प्रकल्प येथे आहेत. मोदी यांनी खालवणी इको टूरिझम क्षेत्रास भेट दिली. नर्मदेच्या किनाऱ्यावर गरुडेश्वर येथे असलेल्या दत्त मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले.