मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीच्या तीरावर असणारा राजघाट गुरूवारी प्रशासनाकडून तोडण्यात आला. सरकारची या कृतीमुळे गांधीजींची दुसऱ्यांदा हत्या झाली आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या सरदार सरोवराच्या बांधाची उंची १३८ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील काही गावे पाण्याखाली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जुलैपूर्वी या गावातील लोकांचे पूनवर्सन करण्याचे आदेश दिले होते. पाण्याचा स्तर वाढल्याने या परिसरातील गांधीजींची समाधी असणारा राजघाटही पाण्याखाली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून हा राजघाट तोडण्यात येणार होता. या विरोधात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर गुरूवारपासून उपोषणाला बसणार होत्या. त्यामुळे हा प्रश्न चिघळेल हे लक्षात घेऊन सरकारी अधिकाऱ्यांचे पथक पहाटे चार वाजताच या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात पोलिसांचा फौजफाटा होता. सर्व तयारी झाल्यानंतर सकाळी ६.३० च्या सुमारास कस्तुरबा गांधी व महादेव भाई यांचा अस्थिकलश असणारा क्राँकिटचा चौथरा जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आला. हा सगळा प्रकार घडत असतानाच मेधा पाटकर त्याठिकाणी पोहचल्या. मात्र, तोपर्यंत राजघाटाचा बहुतांश भाग तोडण्यात आला होता. कोडगेपणाचा कळस म्हणजे कस्तुरबा गांधी व महादेव भाई देसाई यांचे अस्थीकलश जेसीबीमध्ये ठेवून नेण्यात येत होते. यावर मेधा पाटकर यांनी संताप व्यक्त केला. राजघाट तोडायचाच होता तर त्यासाठी व्यवस्थितपणे तयारी करायला पाहिजे होती. लोकांच्या मनात महात्मा गांधीजींविषयी आदर आहे. मात्र, बडवानीमध्ये प्रशासनाने ज्याप्रकारे ही कारवाई केली तो प्रकार म्हणजे महात्मा गांधींची दुसऱ्यांदा हत्या करण्यासारखा असल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले.

मात्र, राज्य सरकार खूपच असंवेदनशील झाले आहे. न्यायालयात ते खोटी माहिती सादर करतात. तसेच ज्या लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे त्यांच्या यादीमध्येही घोळ आहे. सरकारने या लोकांशी साधी चर्चाही केलेली नाही. लोकशाहीत असे होत नाही. मात्र, मध्य प्रदेशात लोकशाहीच्या तत्त्वांना हरताळ फासला जात आहे. सध्या गुजरातला पाण्याची गरज नाही, कारण त्याठिकाणी सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी एक वर्षाचा वेळ घेऊन नंतर सरदार सरोवराची उंची वाढवण्यात यावी, असे मेधा पाटकर यांनी म्हटले.