नासाच्या केप्लर दुर्बीणीला पृथ्वीसारखा एक ग्रह सापडला असून त्याचे नामकरण केप्लर ४५२ बी असे करण्यात आले आहे, तो वसाहतयोग्य ग्रह असलेल्या टप्प्यात असून जी प्रकारच्या ताऱ्याच्या भोवती फिरत आहे. त्याचा मातृताराही सूर्यासारखाच आहे. त्यावर जीवसृष्टी आहे की नाही हे अजून समजू शकलेले नाही, पण झाडे जर तेथे नेऊन लावली तर ती तेथे नक्की जिवंत राहतील, असा दावा खगोलवैज्ञानिकांनी केला आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ सापडलेला हा पृथ्वीसारखा जुळा ग्रह मानला जात आहे. हा ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा १.५ अब्ज वर्षे जुना असल्याने त्यातून आपल्याला पृथ्वीची निर्मिती कशी झाली असावी हे समजू शकेल. पृथ्वीचे वय दीड अब्ज वर्षे होईल तेव्हा हरितगृह परिणामाने तेथील सागर कोरडे पडतील व जमिनीवर वाळवंट असेल.
हा ग्रह खडकाळ आहे की नाही हे समजू शकलेले नाही, वैज्ञानिकांच्या मते तशी शक्यता जास्त आहे. केप्लर ४५२ बी या ग्रहाचे भूशास्त्रीय स्वरूप आपल्या ग्रहासारखेच आहे. तसे असेल तर हा ग्रह धोक्याच्या अवस्थेतून जात आहे. प्रकल्प संचालक जॉन ग्रन्सफेल्ड यांनी सांगितले की, हा ग्रह म्हणजे पृथ्वीची दुसरी आवृत्ती म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यावरून तरी असेच दिसत आहे. केप्लर ४५२ बी हा पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह असून त्याचा कक्षाकाळ ५ टक्के अधिक म्हणजे ३८५ दिवस आहे. पृथ्वीच्या साठ पटींनी मोठा असलेला हा ग्रह चौदाशे प्रकाशवर्षे दूर असून हंस तारकासमूहात आहे. तो गोल्डीलॉक झोनमध्ये असून त्याच्या भोवती द्रव घटक असण्याची शक्यता आहे. नॉटिंगहॅम येथील ट्रेन्ट विद्यापीठाचे खगोल वैज्ञानिक डॉ. डॅनियल ब्राऊन यांनी सांगितले की, पृथ्वीसारखाच वर्णपंक्तीपट या केप्लर ४५२ बी या ग्रहाचाही आहे. याचा अर्थ पृथ्वीवरील वनस्पती तेथेही वाढू शकतात. तो ज्या ताऱ्याभोवती फिरत आहे, तो तारा सूर्याइतका तप्त व १० टक्के प्रखर तर २० टक्के मोठा आहे. केप्लर २ बी या ग्रहावर जाडसर, ढगाळ वातावरण असून ज्वालामुखीही आहेत. या ग्रहावर पुढील ५०० कोटी वर्षे द्रव पाणी असेल, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. केप्लर दुर्बीणीने २००९ ते २०१३ या काळात जी माहिती जमवली आहे त्यावर आधारित केप्लर ४५२ बी ग्रहाचा शोध आहे. सूर्यासारख्या ताऱ्यांभोवती केप्लर दुर्बीणीने किमान एक हजार ग्रहांचा शोध लागला असून त्यातील अकरा ग्रह वसाहतयोग्य आहेत. प्रत्येक ग्रहाचा शोध अधिक्रमणाच्या वेळी लागलेला आहे, तेच या ग्रहाच्या बाबतीतही खरे आहे.