नासाच्या परसिव्हिरन्स या बग्गीसारख्या गाडीने मंगळाच्या पृष्ठभागावर पहिला फेरफटका पूर्ण केला असून एकूण ६.५ मीटर अंतर या गाडीने कापले. विज्ञान प्रयोग सुरू करण्यापूर्वी गाडीने हे अंतर कापले आहे. ही गाडी किमान ३३ मिनिटे सफरीवर होती.

पहिले चार मीटर अंतर ही गाडी सरळ गेली, नंतर डावीकडे १५० अंश कोनातून वळली व २.५ मीटर अंतर कापून परत आली. सध्या ती एका तात्पुरत्या उभ्या राहण्याचा ठिकाणी आली आहे. नासाने म्हटले आहे, की या गाडीची ही चाचणी सफर होती. त्यात प्रत्येक उपप्रणालीचे कार्यान्वयन व उपकरणे तपासण्यात आली. विज्ञान प्रयोगांसाठी ही सफर हा एक प्राथमिक प्रयोग होता.

या प्राथमिक फेरफटक्याचे वेगळे  महत्त्व होते, असे संचालन अभियंता अनैस झारीफन यांनी सांगितले. परसिव्हिरन्स रोव्हर गाडी ही नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने तयार केली असून या गाडीला एकूण सहा चाके आहेत. गाडी व्यवस्थित चालू आहे हे आता स्पष्ट  झाल्याने वैज्ञानिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील दोन वर्षे ही गाडी काम करू शकते. वैज्ञानिक उद्दिष्टे पूर्ण करताना रोव्हर गाडी २०० मीटरचे अंतर  कापू  शकेल. या गाडीच्या मदतीने भूगर्भशास्त्र व हवामानाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यातून मंगळ मानवी वसाहतीस योग्य आहे का याचा शोध घेतला जाणार आहे. मंगळावरील माती व खडक गोळा करण्यात येणार आहेत. १८ फेब्रुवारीला गाडीच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या होत्या. सॉफ्टवेअरही अद्ययावत केले होते.